इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-२७ विमानांची तुकडी उद्या शेवटचं उड्डाण करणार आहे. मिग-२७ फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.

जोधपूर एअर बेसवर मिग-२७ ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-२७ चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल. त्यानंतर ही विमाने निवृत्त होईल. देशभरात पुन्हा कुठेही ही विमाने उड्डाण करणार नाहीत” अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी दिली.

काय आहे मिग-२७ चे वैशिष्टय

– भारताने १९८० च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियन म्हणजे आताच्या रशियाकडून ही फायटर विमाने विकत घेतली होती.

– कारगिल युद्धातील मिग-२७ ची कामगिरी पाहून हे विमान चालवणाऱ्या फायटर वैमानिकांनी या विमानाला ‘बहादूर’ हे टोपण नाव दिले होते.

– शक्तीशाली इंजिन असलेल्या मिग-२७ मध्ये मोहिमेच्या गरजेनुसार काही बदल करता यायचे.

– कॉकपीटसह विमानातील अत्याधुनिक सिस्टिममुळे वैमानिकाला अत्यंत अचूकतेने शत्रूवर प्रहार करणे शक्य झाले.

– २० वर्षांपूर्वी १९९९ साली पाकिस्तान बरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात मिग-२७ ने अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावली.

– कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्या सोडून पळ काढावा लागला.

– मागच्या काही वर्षात मिग-२७ च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे २०१७ सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला.

– मिग-२७ ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.

– आयएएफची २९ क्रमांकाची स्क्वाड्रन फक्त अपग्रेडेड मिग-२७ ऑपरेट करते. १० मार्च १९५८ साली ही स्कवाड्रन स्थापन झाली आहे.