भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी व जागल्याची भूमिका पार पाडणारे संजीव शर्मा यांनी माहिती अधिकारात केंद्रीय माहिती आयोगाकडे किमान ३५०० अर्ज म्हणजे याचिका सादर केल्या असून अजूनही त्यांची संख्या वाढतच चालली आहे. आयोगाने त्यांनी सादर केलेल्या अर्जातील मुद्दय़ांच्या आधारे काही गट करून सुनावणी करण्याचे ठरवले आहे व नंतर त्यावर निकाल दिला जाणार आहे.

माहिती अधिकारात अर्ज करणे योग्य असले तरी इतक्या मोठय़ा प्रमाणावर अर्ज करण्याने उलट अडथळे निर्माण होऊ शकतात. माहिती आयोगाने म्हटले आहे की, यातील बहुतांश अर्ज मुख्य निवडणूक आयुक्तांपुढे ठेवण्यात आले असून आता ते निकाली कसे काढायचे हा प्रश्नच आहे. एकाच व्यक्तीकडून किती माहिती अर्ज यावेत याला काही मर्यादा घालण्याची गरजही यातून दिसून येत आहे. हवाई दलाकडे भ्रष्टाचाराबाबत केलेले अर्ज योग्य सुनावणी न करताच फेटाळण्यात आले, असे शर्मा यांचे म्हणणे आहे.