येत्या २७ मे रोजी तामिळनाडूत सुलूरमध्ये इंडियन एअर फोर्सची ‘फ्लाईंग बुलेट्स’ ही १८ नंबरची स्क्वाड्रन कार्यान्वित होणार आहे. स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या फायटर विमानाने ही स्क्वाड्रन सुसज्ज असेल. IAF मधील ‘तेजस’ची ही दुसरी स्क्वाड्रन आहे. एअर फोर्स प्रमुख आर.के.एस. भदौरिया यांनी ही माहिती दिली.

तेजसची पहिली स्क्वाड्रन सुद्धा याच सुलूर एअरबेसवर तैनात आहे. २०१६ साली कार्यान्वित झालेल्या या स्क्वाड्रनमध्ये सुरुवातीला दोन फायटर विमाने होती. एअर फोर्सने आतापर्यंत ४० तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विमानांची निर्मिती केली आहे.

मार्च महिन्यात संरक्षण मंत्रालयाने एचएएलकडून 83 LCA Mk-1A तेजस विमाने खरेदी करण्याची परवानगी दिली. पुढच्या काही महिन्यात या संबंधीच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. हा एकूण व्यवहार ३८ हजार कोटी रुपयांचा आहे. LCA Mk-1A हे तेजसचे आणखी अत्याधुनिक स्वरुप असणार आहे. तेजस विमानाची निर्मिती केल्यापासून त्यात सतत सुधारणा सुरु आहेत. स्वदेशात बनवण्यात आलेले हे चौथ्या पिढीचे फायटर विमान आहे.