भारताच्या चीन, पाकिस्तान आणि नेपाळला लागून असलेल्या सीमांवर सध्या तणाव आहे. चीनकडून तर युद्धाची भाषा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन एअर फोर्समध्ये आज स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानाच्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा समावेश झाला. स्वत: एअर फोर्स प्रमुख आर.के.एस. भदौरिया यांनी ‘तेजस’मधून उड्डाण केले.

– तामिळनाडूतल्या सुलूर बेसवर इंडियन एअर फोर्सची ‘फ्लाईंग बुलेट्स’ ही १८ नंबरची स्क्वाड्रन कार्यान्वित झाली आहे.

– IAF मधील ‘तेजस’ची ही दुसरी स्क्वाड्रन आहे.

– तेजसची पहिली स्क्वाड्रन सुद्धा याच सुलूर एअरबेसवर तैनात आहे. २०१६ साली कार्यान्वित झालेल्या या स्क्वाड्रनमध्ये सुरुवातीला दोन फायटर विमाने होती. सुलूर एकमेव एअरबेस आहे, जिथे तेजसची दोन स्क्वाड्रन आहेत.

– याच एअर बेसवरील नंबर ४५ फ्लाईंग डॅगर्स ही तेजसची पहिली स्क्वाड्रन आहे.

– नंबर १८ ‘फ्लाईंग बुलेट्स’ स्क्वाड्रनची स्थापना १५ एप्रिल १९६५ रोजी झाली.

– ‘फ्लाईंग बुलेट्स’ मध्ये रशियन बनावटीची मिग-२७ फायटर विमाने होती. १५ एप्रिल २०१६ रोजी या स्क्वाड्रनमधील मिग-२७ विमानांचा वापर थांबवण्यात आला.

– एक एप्रिल २०२० रोजी नंबर १८ स्क्वाड्रनचे पुनरुत्थान करण्यात आले.

– ‘फ्लाईंग बुलेट्स’ ही स्क्वाड्रन १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झाली होती. या स्क्वाड्रनमधील वैमानिक निर्मल जीत सिंग यांना परम वीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

– हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून एअर फोर्स आणि नौदलासाठी तेजस विमानांची निर्मिती केली जात आहे.

– हवेतून हवेत लढले जाणारे युद्ध, लेझर गाइडेड बॉम्बफेक तसेच विमानातील अत्याधुनिक प्रणालीमुळे अनगाइडेड बॉम्ब सुद्धा अचकूतेने टाकण्यास तेजस सक्षम आहे.

– तेजस चौथ्या पिढीचे फायटर विमान आहे. त्यात अजून अनेक सुधारणा करण्यात येत आहेत.