फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या दोन वैमानिकांनी ही मोहीम फत्ते करण्याआधीचा आणि स्ट्राइकदरम्यान आलेला आपला सगळा अनुभव सांगितला आहे. एअर स्ट्राइक करण्याआधी आम्ही खूप साऱ्या सिगारेट ओढल्या असं एका वैमानिकाने सांगितलं आहे. आणि आम्हाला जेव्हा एअर स्ट्राइकसंबंधी कळलं तेव्हा आम्ही उत्साहात होतो आणि मनात सतत चढ उतार सुरु होता असं तरुण स्क्वाड्रन लीडरने सांगितलं आहे.

दोन मिराज २०० लढाऊ विमानांच्या वैमानिकांपैकी एका विमानाचे वैमानिक असणाऱ्या स्क्वाड्रन लीडरने एनडीटीव्हीशी बोलताना स्ट्राइकमध्ये असणाऱ्या आपल्या भुमिकेबद्दल सांगितलं आहे. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमधील एखाद्या ठिकाणाला लक्ष्य करत भारतीय हवाई दल हल्ला करत होतं. दोन्ही वैमानिकांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

दुसऱ्या स्क्वाड्रन लीडरने सांगितलं आहे की, हे संपूर्ण ऑपरेशन जवळपास अडीच तासांनंतर पूर्ण झालं. दोन्ही वैमानिकांनी ठरलेल्या टार्गेटवर स्पाइस २००० सॅटेलाईट गाईडेड बॉम्बने हल्ला केला.

२६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने १२ मिराज २००० जेट तैनात केले होते. यामधून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इस्त्राईल शस्त्रांचा वापर करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची योजना होती. स्पाइस २००० अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलं होतं, की एखाद्या खोल ठिकाणी घुसून ते आपलं टार्गेट नष्ट करु शकतं.याशिवाय आपलं टार्गेट नष्ट केल्यानंतर त्याचा व्हिडीओ फिडही देण्यात सक्षम आहे. शस्त्रांचा उपयोग टार्गेटवरील सर्व सुविधा नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता तसंच भारतीय हवाई दलाला हल्ल्याचे व्हिडीओ पुरावेही मिळाले. फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. एअर स्ट्राइक करत भारताने या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवला.

भारतीय हवाई दलाने मिराज २००० च्या खालीली बाजूस लावण्यात आलेले स्पाइस २००० बॉम्ब निर्देशित करण्यात आलेल्या ठिकाणी पाडले होते. हल्ल्याच्या दिवशी ‘लो क्लाउड बेस’ने भारतीय हवाई दलाला ‘क्रिस्टल मेज’ शस्त्राचा वापर करण्यापासून रोखलं होतं. मात्र लढाऊ विमाने त्यांच्याकडे असणाऱ्या सहापैकी पाच स्पाइस २००० बॉम्बचं लॉचिंग करण्यात यशस्वी ठरली होती.

भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यावरुन नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आरोप प्रत्यारोप होत आहे. मिराज विमानाच्या दुसऱ्या वैमानिकाने मात्र स्पाइस २००० ने आपल्या टार्गेटला लक्ष्य केलं यामध्ये काही दुमत नाही असं सांगितलं आहे. सॅटेलाइट इमेजिंग कंपनी DigitalGlobe कडून जारी करण्यात आलेल्या फोटोंमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतरही जैश-ए-मोहम्महच्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारती योग्य स्थितीत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. यासंबंधी बोलताना एका वैमानिकाने सांगितलं की, ‘सॅटेलाइट इमेजरी ज्या रिजोल्युशनमध्ये दाखवण्यात आल्या त्या शस्त्रांनी प्रवेश केलेल्या ठिकाणाच्या जवळपासही नाहीत. जे दाखवलं पाहिजे ते त्यात नव्हतं’. स्पाइस २००० चूक करणारं शस्त्र नाही. हल्ल्यात इमारतींच्या छतांचं झालेलं नुकसान लपवण्याचा प्रयत्न केला गेला असावा असंही वैमानिकाने सांगितलं आहे.

स्पाइस २००० अशाप्रकारे डिझाईन कऱण्यात आलं आहे की, एका ठराविक खोलीपर्यंत गेल्यानंतरच त्याचा स्फोट होईल याची नेहमीच भारतीय हवाई दलाने काळजी घेतली आहे. या खास बॉम्बचा मुख्य उद्देश इमारतीला काही नुकसान न पोहोचवता मानवी लक्ष्य बाहेर काढणं होतं. यावेळी एनडीटीव्हीला टार्गेटमध्ये सामील असणाऱ्या एका इमारतीच्या छतावर तीन मोठे छेद असणारी अल्ट्रा-हाय रिझोल्यूशन फोटो दाखवण्यात आला. हल्ल्याच्या ४३ दिवसांनंतर पाकिस्तानने पत्रकार आणि परदेशी राजदुतांना एअर स्ट्राइक झाला त्या ठिकाणी नेलं होतं. यावेळी त्यांना दहशतवाद्याचं हॉस्टेल असणारी ही इमारत दाखवण्यात आली नव्हती.

एअर स्ट्राइकचा दोन तासांचा काळ तुमच्या करिअरमधील सर्वात मोठा काळ होता का असं विचारलं असता दोघांपैकी एका वैमानकाने सांगितलं की, ‘करण्यासाठी इतकं काही होतं की, वेळ कधी गेला कळलंच नाही’. एअर स्ट्राइकनंतर सर्वात जास्त चिंता होती ती म्हणजे पाकिस्तानच्या प्रतिक्रियेची. यासंबंधी बोलताना दोन्ही वैमानिकांनी सांगितलं की, ‘आपण पाकिस्तानी इंटरसेप्टरला रडारवर घेतलं नव्हतं. मात्र यावेळी पाकिस्तानच्या एका विमानाने भारतीय विमानांच्या दिशेने उड्डाण केल्याची सुचना देण्यात आली होती. पण तोपर्यंत आम्ही आमची मोहीम फत्ते केली होती आणि नुकसान होण्याच्या शक्यतेपासून दूर होतो’. ‘स्पाइस २००० हे फायर ऍण्ड फॉरगेट शस्त्र आहे. एकदा टार्गेटच्या दिशेने लॉन्च केल्यानंतर पुन्हा तिथे जाऊन पाहण्याची गरज नसते’, असं वैमानिकाने सांगितलं आहे.

स्पाइस बॉम्ब लॉन्च करण्यासाठी आम्ही नियंत्रण रेषा पार करत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये घुसलो होतो असं एका वैमानिकाने सांगितलं आहे. मिशन पूर्ण झाल्यानंतर बेसमध्ये परतलात तेव्हा काय केलं अस विचारलं असता दोन्ही वैमानिक एकमेकांकडे पाहून असेल. यामधील एकजण म्हणाला ‘काही नाही आम्ही अजून थोड्या सिगारेट ओढल्या’.