पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र, या कारवाईवर उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते विनोद कुमार उर्फ पंडित सिंह यांनी शंका उपस्थित केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा असून, असे काही घडलेच नसल्याचे विनोद कुमार म्हणाले आहेत.

‘पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा असून भाजप नेते खोटारडे आहेत. हल्ला होणार हे १० दिवसांपासून माहीत होते. १० दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये हातमिळवणी झाली होती आणि एखाद्या पडक्या घरात एक-दोन बाँब टाकण्याचा निर्णय झाला होता असा आरोप कुमार यांनी केला आहे’. मंगळवारी(दि.27) उत्तर प्रदेशच्या गोंदा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील विधान केलं.

मसूद अझहरनेच ऑडिओ टेपमध्ये दिली हल्ल्याची कबुली –
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, या ऑडिओ टेपमध्ये मसूद अझहरने भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान वारंवार भारतीय हवाई दलाने निर्जनस्थळी बॉम्ब टाकून पळ काढल्याचा दावा केला होता. मात्र हाफिज सईदच्या ऑडिओ क्लिपमुळे हा दावा फोल ठरला आहे.

टाइम्स नाऊने ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाने मसूद अझहरचे अनेक नातेवाईक बेपत्ता असल्याची माहिती दिली असल्याचंही वृत्तात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात मसूद अझहरचे दोन भाऊ आणि मेहुणा मारला गेला आहे. हे सर्वजण त्यावेळी दहशतवादी तळावर उपस्थित होते.

‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा’-
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा सल्ला संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे. मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानवर कारवाई केली. पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवानांचा बदला भारताने घेतला त्यानंतर वायुदलाचं कौतुक होतं आहे. देशभरात जल्लोष साजरा होतो आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं म्हटलं आहे.