सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून स्वदेशी बनावटीची जवळपास ३०० फायटर आणि बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे इंडियन एअर फोर्सकडून सरकारला सांगण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयातील एका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हा संपूर्ण व्यवहार अब्जावधी डॉलर्सचा आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

तेजस मार्क-२ चे दहा स्क्वाड्रन, ३६ अॅडव्हान्स मिडियम (एएमसीए) फायटर विमाने तसेच नवीन बनवण्यात आलेली HTTP-40 ही ट्रेनर विमाने एचएएलकडून खरेदी करणार असल्याचे आयएएफने सरकारला सांगितले आहे. एअर फोर्स प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी जाहीर केलेली एअरफोर्सची ही भूमिका महत्वपूर्ण आहे.

एअर फोर्सच्या एका स्क्वाड्रनमध्ये १६ ते १८ फायटर विमाने असतात. तेजसच्या सुरुवातीच्या व्हर्जनची ४० फायटर विमाने आयएएफने आधीच विकत घेतली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस तेजस मार्क-१ ची ८३ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी होईल. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे. आयएएफ आणि एचएएलमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहे असे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. एचएएलने आतापर्यंत १२ विमाने आयएएफला सुपूर्द केली आहेत. वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेले उत्पादनाचे निर्धारीत लक्ष्य एचएएलला गाठता आलेली नाही.