बहुचर्चित राफेल फायटर विमान भारताकडे सोपवण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. फ्रान्स येत्या १९ सप्टेंबरला पहिले राफेल फायटर विमान इंडियन एअर फोर्सकडे सुपूर्द करणार आहे. हिंदुस्थान टाइम्सने दोन सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. फ्रान्समधील एअर फोर्सच्या तळावर होणाऱ्या छोटेखानी सोहळयामध्ये राफेलचा एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश केला जाईल.

इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा फ्रान्सला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या राफेल विमानाच्या समावेशाचा कार्यक्रम सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडयात करण्याबद्दल IAF ने फ्रान्स सरकारला आधीच कळवले होते. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमानांच्या खरेदीचा करार केला आहे.

औपचारीक समावेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर राफेल विमानांची पहिली तुकडी पुढच्यावर्षी एप्रिल-मे पर्यंत भारतात दाखल होईल. पहिल्या तुकडीत चार राफेल विमाने असतील. सप्टेंबर २०२२ पर्यंत भारताला सर्वच्या सर्व ३६ राफेल विमाने मिळतील. २३ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने फ्रान्सबरोबर ५९ हजार कोटी रुपयांचा ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात या खरेदी व्यवहारावरुन विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते. मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

आयएएफकडे असणाऱ्या स्क्वाड्रनच्या वेगाने घटणाऱ्या संख्येमुळे राफेल खरेदीचा करार करण्यात आला होता. चीन आणि पाकिस्तानबरोबर एकाचवेळी युद्ध लढण्यासाठी आपल्याला ४२ स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. पण सध्या एअर फोर्सकडे फक्त ३१ स्क्वाड्रन आहेत. भारताला मिळणारी राफेल मेटेओर मिसाइल्सनी सुसज्ज असणार आहेत. सर्वच्या सर्व ३६ राफेलच्या समावेशानंतर भारताचे सामर्थ्य कैकपटीने वाढले.