यंदाच्या वर्षी ह्य़ूस्टन येथे वर्णविद्वेषातून गोळीबारात श्रीनिवास कुचीभोटला या भारतीय तंत्रज्ञाचा गोळीबारात मृत्यू झाला. त्या वेळी हल्लेखोराच्या काही गोळ्या अंगावर झेलणारा अमेरिकी नागरिक आयन ग्रिलॉट याचा ‘टाइम’ नियतकालिकाने गौरव केला आहे. या घटनेत कुचीभोटला याचा सहकारी आलोक मदासानी हा जखमी होऊन वाचला होता. २०१७ मध्ये आशेचा किरण ठरलेले नायक म्हणून ज्या पाच जणांची नावे टाइम नियतकालिकाने घेतली आहेत त्यात ग्रिलॉट याचे नाव आहे. नौदलाचा माजी अधिकारी असलेल्या अ‍ॅडम प्युरींटन याने फेब्रुवारीत कन्सासमधील ओलाठ येथे एका बारमध्ये कुचीभोटला व त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोळीबार सुरू असताना अमेरिकी नागरिक ग्रिलॉट हा मदतीसाठी धावून गेला व त्याने काही गोळ्या अंगावर झेलल्या, त्यात तो जखमी झाला होता. त्या वेळी जर मी या घटनेत मध्ये पडलो नसतो तर माझी मलाच खंत वाटत राहिली असती, त्यामुळे मी तसे केले. ‘टाइम’ नियतकालिकाने कन्सास येथील ग्रिलॉट याचा सन्मान करताना त्याला ‘खरा अमेरिकी नायक’ अशा शब्दात गौरवले असून भारतीय अमेरिकी समुदायाने त्याला कन्सास येथे त्याच्या मूळ गावी घर घेण्यासाठी १ लाख डॉलर्सची मदत केली होती. अनेकांच्या शुभेच्छांशिवाय जखमी अवस्थेतून मी बरा होऊन आताच्या अवस्थेत आलो नसतो. माझ्यासाठी हे वर्ष हे आशीर्वादच आहे कारण त्या गोळीबारात भारतीयांचे प्राण वाचवतानाही मी जिवंत राहिलो.

ही घटना घडली तेव्हा ग्रिलॉट हा त्या रेस्टॉरंटमध्ये बास्केटबॉलचा सामना बघत होता. त्या वेळी बंदुकधारी श्रीनिवास व आलोक यांच्या जवळ आला व माझ्या देशातून चालते व्हा असे ओरडला. अ‍ॅडम प्युरींटन या ओलाथ येथील हल्लेखोराने केलेल्या गोळीबाराचा मारा ग्रिलॉट यानेही झेलला, नंतर प्युरिंटन याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

टाइम सन्मानाचे इतर मानकरी

मारिया वादळातील लोकांना अन्न देणारा खानसामा जोस अ‍ॅड्रीयस. त्याने त्याच्या ना नफा संस्थेमार्फत २८ लाख लोकांना जेवण पुरवले होते. कॅलिफोर्नियातील वणव्यात गुरांना मागे न सोडता त्यांचे रक्षण करणारा पाळीव कुत्रा ओडिन, लासव्हेगास हत्याकांडात इतरांचे रक्षण करणारे जोनाथन स्मिथ, हार्वी वादळाच्या वेळी  मानवी साखळी करून पाण्याने वेढलेल्या वाहनात एका महिलेची प्रसूती यशस्वी करणाऱ्या तारा गोवर.