दिल्लीमध्ये आयएएस अधिकारी दिर्घ काळापासून संपावर असल्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आरोप आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने फेटाळला आहे. आयएएस संघटनेने आज (रविवार) पत्रकार परिषदेत अधिकारी संपावर नसल्याचे स्पष्ट केले. सर्व अधिकारी काम करत आहेत. इतकंच नव्हे तर सुट्टीच्या दिवशीही ते काम करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. मुख्य सचिवांवरील हल्ल्यानंतर अधिकारी घाबरले आहेत. राजकीय कारणांमुळे आम्हाला ‘टार्गेट’ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आमच्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत. अधिकारी संपावर असल्याचे खोटे वृत्त पसरवले जात आहे, असे संघटनेने म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कॅबिनेटच्या ३ इतर मंत्र्यांसह मागील आठवड्यापासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलनास बसले आहेत. दिल्लीतील अधिकारी दिर्घ काळापासून संपावर असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्ली आयएएस संघटनेच्या मनिषा सक्सेना म्हणाल्या की, आजची पत्रकार परिषद आमच्यासाठी खूप असामान्य आहे. आम्ही कधीच विचार केला नव्हता की, आम्हाला अशा पद्धतीने आमची बाजू मांडावी लागेल. आम्ही संपावर नाहीत. आमचा कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नाही. दिल्लीत सर्व अधिकारी काम करत आहेत. सुट्टीच्या दिवशीही ते काम करत आहेत. दिल्लीतील परिस्थिती सामान्य नाही.

पावसाळा तोंडावर आहे पण अधिकाऱ्यांच्या संपामुळे आतापर्यंत नालेसफाईचे कामही सुरू झालेले नाही. पण संघटनेने हा आरोप फेटाळला आहे. हे सर्व खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.