30 September 2020

News Flash

IAS-IPS दाम्पत्याची ‘दरियादिली’!; शहीद जवानाच्या मुलीला दत्तक घेतले

युनूस खान आणि अंजुम आरा यांचा स्तुत्य निर्णय

युनूस खान आणि अंजुम आरा

पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दोन जवानांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्यावर साऱ्या देशात संताप पाहायला मिळाला. पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून करण्यात आली आणि सरकारमधील अनेकांनी पाकिस्तानला गर्भित इशारेदेखील दिले. मात्र शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचे पुढे काय होणार, असा विचार अनेकांनी केलाच नाही. मात्र हिमाचल प्रदेशातील एका दाम्पत्याने देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानाच्या मुलांचा विचार करुन एका मुलीला दत्तक घेतले आहे. शहीद जवानाच्या १२ वर्षीय मुलाचा सर्व खर्च हिमाचल प्रदेशातील दाम्पत्य करणार आहे.

पाकिस्तानी सैन्याने १ मे रोजी पूँछमध्ये नायब सुभेदार परमजीत सिंग यांची हत्या करत त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. परमजीत सिंग यांच्या बलिदानाला संपूर्ण देश सलाम करत असला, तरी त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच होता. हिमाचल प्रदेशातील कुलूचे उपायुक्त युनूस खान आणि त्यांची पोलीस अधिकारी असलेली पत्नी अंजुम आरा यांनी परमजीत सिंग यांच्या एका मुलीची जबाबदारी घेत त्यांच्या कुटुंबासमोरील प्रश्न काही प्रमाणात सोडवला आहे.

परमजीत सिंग यांची १२ वर्षीय मुलगी खुशदीप कौरच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च युनूस खान आणि अंजुम आरा करणार आहेत. खुशदीपचे भविष्य उज्ज्वल असावे, यासाठी या दाम्पत्याने तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ‘खुशदीप तिच्या कुटुंबासोबतच राहील. मात्र तिचा शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च आम्ही करु. आम्ही वेळोवेळी तिला भेटत राहू आणि तिला काही अडचणी येत असल्यास त्या सोडवू. तिला आयएएस, आयपीएस किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल, तरी आम्ही कायम तिच्या पाठिशी राहू’ असे सोलन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक असलेल्या अंजुम आरा यांनी सांगितले.

‘शहीद जवानाच्या कुटुंबावर दु:खाचा किती मोठा डोंगर कोसळला आहे, याची कल्पना करणे कठीण आहे. मात्र आम्ही त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमजीत यांच्या मुलीला शिक्षणात मदत करुन आम्ही जबाबदार नागरिक म्हणून आमचे कर्तव्य बजावत आहोत,’ असे युनूस खान यांनी म्हटले. ‘गावातील शाळेत शिकायचे आहे की शहरातील शाळेत, याचा निर्णय खुशदीप घेईल. आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या कायम पाठिशी असू,’ असे युनूस पुढे बोलताना म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 5:06 pm

Web Title: ias ips couple to adopt martyrs daughter
Next Stories
1 ‘निर्भया’च्या दोषींना झालेल्या फाशीचं सगळीकडून स्वागत
2 भारतीय अर्थव्यवस्थेला जीएसटीचा फायदा; विकासदर ८ टक्क्यांपर्यंत पोहचेल- शक्तिकांत दास
3 माझ्या मुलीलाच नव्हे, तर देशालाही न्याय मिळाला; निकालानंतर निर्भयाची आई भावूक
Just Now!
X