पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जनक्रांतीचे आवाहन करणारे भाष्य फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील भाजप सरकारने सनदी अधिकारी अजयसिंह गंगवार यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

पं. जवाहरलाल नेहरू यांची स्तुती केल्यानंतर गंगवार यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. फेसबुकवरील वक्तव्याबाबत गंगवार यांच्यावर एका ओळीची नोटीस बजावण्यात आली असून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र आपण फेसबुकवर टीकात्मक भाष्य केल्याचा गंगवार यांनी इन्कार केला आहे. फेसबुकवरील या पोस्टचा स्रोत काय अशी विचारणा आपण करणार आहोत, त्यांना समाजमाध्यमांवरून कदाचित ती मिळाली असेल कारण नेहरूंबाबत आपण जे भाष्य केले ते त्यांच्यावरच उलटले आहे त्यामुळे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते हे प्रकार करीत आहेत, असे गंगवार म्हणाले.

मोदीविरोधी टिप्पण्णी लक्षात आली तेव्हा सरकारने कारवाई केली, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे प्रधान सचिव एस. के. मिश्रा यांनी सांगितले. नेहरूंबाबत गंगवार यांनी जे भाष्य केले त्याच्याशी काहीही संबंध नाही, असेही मिश्रा म्हणाले. गेल्या आठवडय़ात गंगवार यांची भारवानीच्या जिल्हाधिकारी पदावरून उचलबांगडी करून तात्पुरत्या स्वरूपासाठी सचिवालयात उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. आपण राजकारणाकडे वळणार का, असे विचारले असता गंगवार म्हणाले की, आपण सामाजिक क्षेत्रातील आहोत आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती नेहमीच राजकीय होऊ शकते.