लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत देशभरातील सार्वजनिक बँकांच्या अर्थव्यवहारावर ८ एप्रिलनंतर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसाकाठी ११०० कोटी रुपयांचा व्यवसाय बुडण्याबरोबरच ३३० कोटी रुपयांचे उत्पन्नही बुडण्याची चिन्हे आहेत. मात्र, तत्पूर्वी बँकांनी खबरदारी घेतली तर हे सर्व टाळता येईल. त्याला कारणही तसे सबळ आहे, मायक्रोसॉफ्टच्या एक्सपी या ऑपरेटिंग प्रणालीची अखेर!
मायक्रोसॉफ्टची विंडोज एक्सपी ही जगन्मान्य ऑपरेटिंग सिस्टीम. देशातील बहुतांश सार्वजनिक बँकांचे संगणकीकरण याच ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारलेले आहे. बँकांचे आर्थिक व्यवहारही याच प्रणालीवर चालतात. मात्र, ८ एप्रिल २०१४ नंतर मायक्रोसॉफ्टने आपल्या या लोकप्रिय प्रणालीला कायमचा निरोप देण्याचे ठरवले आहे. या पाश्र्वभूमीवर देशभरातील बँकांनी त्यांच्या एक्सपी प्रणालीच्या वापराबाबत ठोस निर्णय घेण्याचे आवाहन भारतीय बँक संघटनेने (आयबीए) केले आहे. बँकांनी वेळीच उपाययोजना न केल्यास ८ एप्रिलनंतर वर उल्लेख केलेल्या आर्थिक ताणांना सामोरे जावे लागणार  आहे. सार्वजनिक बँकाच्या किमान ३४ हजार शाखांना फटका बसण्याची शक्यता आहे.

एक्सपी प्रणाली बाद का होणार?
ऑक्टोबर, २००१ मध्ये सादर झालेली विंडोज एक्सपी ही प्रणाली विंडोज ८ च्या किमान तीन पिढय़ा पिछाडीवर आहे. त्यामुळे विद्यमान काळात ती कालबाह्य़ झाल्यासारखेच आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्स्पी बाद करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत आयबीएने याविषयी देशातील बँकांना सूचित केले होते.

मायक्रोसॉफ्टच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर सर्व बँकांनी योग्य ती काळजी घेऊन ८ एप्रिलनंतर आपली सेवा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
– के. उन्नीकृष्णन,
उपाध्यक्ष, आयबीए

आम्ही बहुतांश बँकांशी याबाबत संपर्क साधून आहोत. त्यांच्या कार्यप्रणालीत काही बाधा येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, बँकांनी अद्याप हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही, हे खेदजनक आहे.
– अमरीश गोयल,
सरव्यवस्थापक, मायक्रोसॉफ्ट इंडिया