संयुक्त अरब अमिरातीत एका दूध उत्पादक कंपनीने जगात प्रथमच उंटाच्या दुधाचे आइस्क्रीम तयार केले आहे. त्यात उंटाच्या दुधाची पावडर वापरली आहे. त्यातून या आइस्क्रीमचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करता येते.
अल ऐन डेअरी या कंपनीने ते काही निवडक दुकानात विक्रीस ठेवले असून, संयुक्त अरब अमिरातीत ते कॅमलेट नावाने विकले जाणार आहे. अतिशय महत्त्वाची अशी ही कामगिरी अल ऐन डेअरीने केली आहे, पण त्याचा मान संयुक्त अरब अमिरातीलाही मिळाला आहे, असे या डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला सैफ अल दारमाकी यांनी सांगितले. पाश्चरीकरणाच्या पद्धतीत उंटाचे दूध टिकवणे अवघड असते, कारण त्यातील प्रथिने फार गुंतागुंतीची असतात, त्यामुळे त्याचे आइस्क्रीम तयार करणे अवघड होते. उंटाच्या दुधाचे आइस्क्रीम तयार करण्याची ही कल्पनाच अभिनव असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
उंटाच्या दुधाचे आइस्क्रीम सहा स्वादांत उपलब्ध असून त्यात खजूर, केशर, वेलची, चॉकलेट, रासबेरी, व्हॅनिला, कॅरमेल यांचा समावेश आहे.
या कंपनीने उंटाच्या दुधाची भुकटी तयार केली असून, त्यात उंटाच्या दुधातील पाणी १०० टक्के काढून ते कोरडे केले जाते. उंटाच्या दुधापासून केलेले हे पदार्थ पोषणाच्या दृष्टीने युरोप व उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. कॅमलेट उत्पादनांमुळे आता आमची बाजारपेठ आणखी वाढणार आहे असे अल दारमाकी यांनी सांगितले.
उंटाच्या दुधाचे अनेक वैद्यकीय उपयोग असून जगातील लोकांना त्यापासून बनवलेले पदार्थ उपलब्ध व्हावेत हा आमचा हेतू आहे असे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त अरब अमिरातीत उंटाच्या दुधाचे पदार्थ कॅमलेट नावाने प्रथम अल ऐन डेअरी फार्मने २००४ मध्ये सादर केले व सुपर मार्केट्समध्ये ते उपलब्ध आहेत.