१८ व्या शतकातील वैदिक पर्वापासून देशाने मिळविलेल्या प्राचीन वैज्ञानिक यशाचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न म्हणून भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेने (आयसीएचआर) पहिल्या संशोधन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

ऐतिहासिक संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या या परिषदेने बंगळुरूतील जैन विद्यापीठाचे प्राध्यापक आर. एन. अय्यंगार यांना पाच लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. मार्च महिन्यात झालेल्या परिषदेच्या शेवटच्या बैठकीत गर्ग-ज्योतिषबाबत अभ्यास करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या बैठकीचे इतिवृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, अनुदान दोन वर्षांसाठी देण्यात आले आहे.

वृद्ध-गर्ग-संहिताच गर्ग-ज्योतिष म्हणून ओळखली जाते, या प्राचीन ग्रंथात ८०० अध्याय आहेत आणि त्याचा आर्यभट्टांच्या गणितीय खगोलशास्त्रावर प्रभाव आहे, असा दावा अय्यंगार यांनी केला आहे. आपल्या अभ्यासक्रमासाठी आयसीएचआरने निधी देण्याचे मान्य केले आहे, असे अय्यंगार यांनी सांगितले.

आपण गेल्या चार दशकांपासून बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेशी संलग्न आहोत; भूकंप, नैसर्गिक आपत्ती आदींवर संशोधन करीत आहोत, असेही ते म्हणाले.

प्राचीन काळात देशाची वैज्ञानिक प्रवृत्ती मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभारत आणि रामायणातील उदाहरणे दिली तेव्हापासून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आयसीएचआरच्या प्रयत्नांबाबत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने सर्वप्रथम ३ ऑक्टोबर २०१५ रोजी माहिती दिली होती.