आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर सध्या सुट्टीवर आहेत. त्यांच्या विरोधात व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चौकशी सुरु आहे. अशात आता त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले असून त्यांच्या जागी संदीप बक्षी हे आता आयसीआयसीआय बँकेचे MD आणि CEO असतील. या दोन्ही पदांचा राजीनामा चंदा कोचर यांनी दिला आहे. संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी हे पद देण्यात आले आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार चंदा कोचर यांची चौकशी सुरुच राहणार आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

चंदा कोचर यांनी राजीनामा दिल्याची बातमी येताच ICICI बँकेचे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी वधारले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने चंदा कोचर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. चंदा कोचर यांना बँकेच्या सगळ्या सहयोगी कंपन्यांच्या जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात आले आहे. संदीप बक्षी हे ३ ऑक्टोबरपासून बँकेचे एमडी आणि सीईओ झाले आहेत. चंदा कोचर यांच्यावर व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्जात नियमांना बगल दिल्याचा, नियम शिथील केल्याचा आरोप आहे.

व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला २०१२ मध्ये ICICI बँकेने ३, २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पतीशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.