कुलभूषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आयसीजेमध्ये भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेबाबतच्या खटल्यावर सध्या सुनावणी सुरु आहे. यावर आज पाकिस्तानने आपली बाजू मांडली.

काल भारताने गुप्तचर असल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानने अटक केलेले कुलभूषण जाधव यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी भारताने सोमवारी आयसीजेमध्ये केली होती. जाधव यांच्यावर पाकिस्तानातील लष्करी न्यायालयात खोटा खटला चालवला गेला आणि त्यांना मृत्यूदंड देण्यात आला तो रद्द करावा, असा युक्तीवाद भारताच्यावतीने करण्यात आला होता.

पाकिस्तानच्यावतीने अड-हॉक न्यायाधीशांसंबंधी घेण्यात आलेल्या आक्षेपावर आयसीजेने म्हटले की, ही मागणी नोंदवण्यात आली असून नजिकच्या काळात यावर उत्तर दिले जाईल. मंगळवारी भारताच्या आरोपांना उत्तर देताना पाकिस्तानच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर यांनी आपल्या युक्तीवादाची सुरुवात खोट्याने केली तसेच जाधवांवरच नव्हे तर भारतावरही दहशतवादाला खतपाणी घातल असल्याचा आरोप केला. मन्सूर म्हणाले, मी स्वतः भारतीय क्रूरतेचा शिकार झालो आहे. एका तरुण लष्करी अधिकाऱ्याच्या नात्याने मी भारताच्या तुरुंगात कैद होतो. पाकिस्तानच्या आर्मी स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० निरपराध मुलांचा जीव गेला होता. हा भारतपुरस्कृत अणगाणिस्तानकडून केलेला दहशतवादी हल्ला होता, असा आरोप त्यांनी केला.

पाकिस्तानकडून आपल्या युक्तीवादामध्ये जाधव यांनाही दहशतवादी म्हणून संबोधण्यात आले. पाकिस्तानने म्हटले की, जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी अनेकांना आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी तयार केले होते. पाकिस्तानात दहशत निर्माण व्हावी यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते. जाधव यांनी चीन-पाकिस्तान कॉरिडॉरलाही धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला, जो पाकिस्तानच्या प्रगतीचा महत्वाचा भाग आहे. हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही तर यामागे भारताचे कारस्थान असल्याचा आरोप करण्यात आला.

पाकिस्तानने म्हटले की, १९४७ पासून भारताकडून पाकिस्तानात अशांतता रहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही मानवता दाखवत रविवारी जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, भारताकडून आजवर त्यांच्या तुरुंगातील पाकिस्तानी बंद्यांबाबत अशा प्रकारे कुठलीही मानवता दाखवण्यात आलेली नाही.