02 March 2021

News Flash

बंडखोर दिग्दर्शक

चित्रपटातून राजकीय भूमिका थेटपणे मांडणारी त्यांची शैली होती.

विसाव्या शतकात स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय सिनेमाला आकार देणारे तीन बंगाली दिग्दर्शक म्हणजे सत्यजित राय, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन. राय-घटक गेल्या शतकातच निवर्तले. मृणाल सेन प्रदीर्घ आयुष्य भोगून नव्या शतकात अंतर्धान पावले. खरं तर या त्रिकुटाच्या सिनेमांनी ‘नव सिनेमा’ला पाठबळ निर्माण केलं, अनेक प्रादेशिक दिग्दर्शकांना प्रेरणा दिली. यांच्या सिनेमांमुळेच जगभर भारतीय सिनेमाला ‘नवी’ ओळख मिळाली.

राय यांनी ‘नव सिनेमाची’ वाट दृग्गोचर  केली, घटक यांनी सिनेमाच्या नव्या आकृतिबंधाची रचना सादर केली, तर सेन यांनी भारतात समांतर सिनेमाची चळवळ  मुक्रर केली.

राय यांच्या आगमनापाठोपाठ लगोलग आलेले मृणाल सेन यांनी राय यांच्या ‘वास्तववादी’ शैलीला छेद देणारे चित्रपट सादर केले. भूतकाळाबद्दल नॉस्टेल्जिया नसलेला एक बंडखोर दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

चित्रपटातून राजकीय भूमिका थेटपणे मांडणारी त्यांची शैली होती आणि ती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातून उतरली होती. साम्यवादी विचारांचे आकर्षण व चळवळींविषयी सक्रिय भान ठेवूनच ते वावरत होते. ‘इप्टा’चाही त्यांच्यावर प्रभाव होता.

वैशिष्टय़पूर्ण कथानकाची निवड करून ती वास्तवपूर्ण, पण कल्पितांचा वापर करत सुरुवातीचे काही चित्रपट त्यांनी सादर केले. ‘नील आकाषेर नीचे’, ‘बाईशे- श्रावण’ व ‘आकाश कुसुम’ असे काही चित्रपट त्यांनी प्रारंभी निर्माण केले. ‘आकाश कुसुम’ पासून त्यांना स्वत:ची चित्रभाषा सापडली आणि वास्तव व कल्पित यांचे अद्भुत मिश्रण साधण्यात त्यांना यश मिळाले. १९६९ ला आलेल्या त्यांच्या ‘भुवन शोम’ या हिंदी चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटाला सुरुवात- मध्य- शेवट या संकेताची कथा नव्हती. स्वत:ला प्रबळ समजणाऱ्या व्यक्तीचा निरागस ग्रामीण मुलीकरवी घडलेला स्वत:च्याच दुर्बलतेचा अनुभव, असा थोडासा हटके विषय मृणालदांनी नावीन्यपूर्ण शैलीत सादर केला होता. या चित्रपटात संताप नव्हता, तर अनुकंपा होती आणि त्यामुळेच त्यावेळच्या हिंदी सिनेमापेक्षा सर्वस्वी वेगळ्या सिनेमाने लक्ष वेधून घेतले. शहरी भागात त्याला लोकप्रियता मिळाली आणि देशात ‘समांतर सिनेमा’ची चळवळ सुरू करणारा सिनेमा म्हणून त्याला बहुमान मिळाला.

यानंतर मात्र त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेला न्याय देणाऱ्या तीन चित्रपटांची शृंखला ‘कलकत्ता ट्रॉयालॉजी’ सादर केली. ‘इंटरव्ह्य़ू’, ‘कलकत्ता-७१’  ‘पदातिक’ या तिन्ही चित्रपटात त्यांनी १९७० च्या कलकत्त्यातील मध्यमवर्गीय तरुणाची भावविवशता व त्याचा सुप्त संताप यांची आपल्या राजकीय विधानांतून सांगड घातली. या चित्रपटांची शैलीही तिरकस होती. समकालीन उद्ध्वस्त जीवनाची पाश्र्वभूमी असणाऱ्या बंडखोर तरुणांची मनोगते त्यांनी चित्रपटाच्या निमित्ताने सांगितली आणि त्या काळातील कलकत्त्यात रस्त्यावर आलेल्या बंडखोर तरुणांची मनोधारणा ‘डॉक्युमेंटरी’ शैलीत सांगितली. या चित्रपटांमुळेच सेन हे राजकीय सिनेमा म्हणून गणल्या जाणाऱ्या सिनेमाचे एकमेव उद्गाते आणि पुरस्कर्ते मानले गेले.

या तीन चित्रपटांनंतर मात्र त्यांनी ‘भुवन शोम’च्या शैलीचा अंगीकार केला. मार्क्‍सवादी विचारांचा प्रभाव काहीसा बाजूला सारून माणसांच्या अंतरंगाचा शोध घेणारे सिनेमे बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘माटीर मानीश’, ‘एकदिन प्रतिदिन’, ‘ओघ ओरी कथा’, ‘एक दिन अचानक’, ‘अकालेर संधाने’ आणि ‘खंडहर’ अशा काही चित्रपटांचा उल्लेख अटळ आहे. ‘एकदिन प्रतिदिन’मध्ये त्यांनी मध्यमवर्गाच्या सुप्त मानसिकतेचा वेध घेतला, तर ‘अकालेर संधाने’ मध्ये त्यांनी दुष्काळाबाबत भूमिका घेताना या वर्गाची त्रेधातिरपीट कशी होते याचा ठाव घेतला. ‘खंडहर’ या नितांतसुंदर हिंदी चित्रपटात त्यांनी भग्न अवशेषांच्या पाश्र्वभूमीवर पाच व्यक्तींच्या आयुष्यातील नाटय़ फुलविले.

स्वत:च्या ८० व्या वर्षी देखील ‘आमार भुबेन’ असा चित्रपट काढणारा आणि अखेपर्यंत अगदी वयाच्या ९४-९५ वर्षांपर्यंत चित्रपट निर्माण करण्याची मनीषा बाळगणारा हा कलावंत.

‘ऑल्वेज बीइंग बॉर्न’ अशा शीर्षकाचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या या दिग्दर्शकाने अठ्ठावीस चित्रपट, पाच डॉक्युमेंटरी आणि चौदा लघुपट आपल्या आयुष्यात निर्माण केले. ‘समांतर सिनेमा’ आणि ‘प्रेक्षक चळवळ’ यांचा खंदा समर्थक म्हणून आयुष्यभर या चळवळीत सक्रिय साथ केली. अनेक पारितोषिके मिळाली, काही नाकारली देखील. ‘माझ्या पाऊलखुणा’ कोठे उमटल्या आहेत, भूतांची पावले उमटत नसतात, असं म्हणणाऱ्या या दिग्दर्शकाने नव्या शतकात निरोप घेतला.. अर्थात नव्या संभ्रमित आणि भयप्रद वाटणाऱ्या या शतकातही पावलं पुन्हा एकदा उमटतील, इतपत गाढ विश्वास त्यांच्या चित्रपटांनी दिला आहे!

– सतीश जकातदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:22 am

Web Title: iconic filmmaker mrinal sen
Next Stories
1 सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारा दिग्दर्शक
2 अंदमान, निकोबारमधील तीन बेटांचे मोदींनी केले नामांतर
3 ‘चौकीदार’च ‘दागदार’, काँग्रेसचा भाजपावर पलटवार
Just Now!
X