भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनने आयडियासोबत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. व्होडाफोन इंडिया आणि याअंतर्गत येणारे व्होडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेड आता आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडिया सेल्यूलरमध्ये विलीन होणार आहे. विलिनीकरणाची ही प्रकिया पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल.

केंद्र सरकारच्या कर तगाद्याने त्रस्त मूळच्या ब्रिटनमधील व्होडाफोनने आपला भारतातील व्यवसाय स्पर्धक आयडिया सेल्युलरला विकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये जानेवारीपासून चर्चाही सुरु होती. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. व्होडाफोनचे विलिनीकरण झाल्याने आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर ही देशातील सर्वात मोठी मोबाईलधारक ग्राहक असणारी कंपनी बनली आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर चेअरमनपद आयडियाकडे जाईल. तर सीएफओचे पद व्होडाफोनकडे गेले आहे. सीईओ आणि सीओओविषयी संयुक्त बैठकीतच निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले. नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनची भागीदारी ४५ टक्के आणि आयडियाची भागीदारी २६ टक्के असणार आहे. पुढे जाऊन आदित्य बिर्ला ग्रूप आणि व्होडाफोनची भागीदारी समान होईल.

रिलायन्स जिओच्या मोफत सेवेमुळे स्पर्धक भारती एअरटेलसह व्होडाफोनचेही धाबे दणाणले. त्यातच सरकारच्या कोट्यवधीच्या कर तगाद्याने व्होडाफोन गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहे. असे असूनही कंपनीने भारती एअरटेलनंतरचे ग्राहकसंख्येचे दुसरे स्थान कायम ठेवले होते.  व्होडाफोनला महसुली उत्पन्न तुलनेत कमी मिळत असल्याने ब्रिटनस्थित व्होडाफोनने भारतातील दूरसंचार व्यवसाय विकण्याचे पाऊल उचलले होते. हचिसनकडून मोबाईल व्यवसाय खरेदी करत व्होडाफोनने २००७ मध्ये भारतीय दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले होते. या संदर्भातील व्यवहारापोटी सरकारने व्होडाफोनवर तब्बल २ अब्ज डॉलरचा कर लावला होता. हा वाद अद्याप सुरू आहे. सध्या भारती एअरटेलचा ३३ टक्के हिस्सा आहे. तर गेल्याच वर्षी दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केलेल्या रिलायन्स जिओचा हिस्सा लवकरच १३ टक्के होण्याचा अंदाज आहे. भारतीचे सध्या सर्वाधिक २६.३३ कोटी ग्राहक आहेत.