जम्मू-काश्मीरला वेगळे केले तर भारताची संकल्पनाच अपूर्ण राहील, असे मत माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले. १९४७ नंतर पुन्हा विभाजन झालेले देशाला सहन होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. ‘कश्मीर क्यों जल रहा है?’ या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा आणि त्यावर मार्ग काढण्यावर भर दिला.

वर्षभरापासून जम्मू-काश्मीर अशांत आहे. हिंसाचार, दगडफेकीच्या घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जम्मू-काश्मीरमधील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात खुर्शीदही सहभागी झाले होते. जम्मू-काश्मीरला वेगळे केले तर भारताची संकल्पनाच अपू्र्ण राहील. भारत एक संकल्पनाच असून त्यात जम्मू-काश्मीरचा सहभाग अनिवार्य आहे. भारतातून जम्मू-काश्मीर वगळल्यास भारतीय संकल्पनेची व्याख्या पुन्हा करावी लागेल. त्यामुळे जम्मू-काश्मीरला वेगळे केल्यास देशाची संकल्पनाच अपूर्ण राहील, असेही खुर्शीद म्हणाले. पाकिस्तानची संकल्पना पूर्ण होवो न होवो, आम्हाला त्याच्याशी देणे-घेणे नाही. मात्र, आमच्या भारताची संकल्पना अपूर्ण राहील. तुम्ही आमच्या देशाच्या संकल्पनेची समीक्षा करण्यास भाग पाडले. आमचा देश आणखी एक विभागणी सहन करू शकत नाही, असे मी पाकिस्तानी वार्ताहरांना अनेकदा बोललो आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘रॉ’चे माजी प्रमुख एस. एस. दुलत यांनीही खुर्शीद यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले.