कांदा व्यापाऱ्यांवर साठवण मर्यादा घालण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. कांद्याचे भाव दिल्लीत ७०-८० रुपये किलो झाले असून देशाच्या इतर भागातही ते गगनाला भिडले आहेत. कांदा उत्पादक राज्यात मोसमी पावसाने कांद्याचे नुकसान झाले असल्याने सध्या कांद्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्राहक कामकाज मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत कांदा ५७ रु., मुंबईत ५६ रु., कोलकात्यात ४८ रु., चेन्नईत ३४ रुपये किलो आहे. गुरगाव व जम्मूत कांद्याचे भाव साठ रुपये किलो आहेत. कांद्याचे भाव आधीच्या सप्ताहात ५०-६० रुपये किलो होते ते आता ७०-८० रु किलोच्या घरात आहेत. केंद्राने पुरवठा वाढवूनही कांद्याचे भाव वाढत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक उपाययोजना करुनही कांद्याच्या दरात दोन तीन दिवसात वाढ झाली आहे.  कांदा उत्पादक राज्यात पावसाने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाली आहे. अल्पकालीन पुरवठा अडचणींमुळे दरवाढ होत असून ती २-३ दिवसांत कमी झाली नाही तर सरकार कांदा व्यापाऱ्यांना साठय़ाबाबत मर्यादा घालून देणार आहे.

हवामान खात्याने म्हटले आहे, की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात कांदा उत्पादन होते तेथे मोसमी पाऊस जास्त झाल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. सध्या जो कांदा बाजारात आहे तो साठवणूक करुन ठेवलेला होता. उन्हाळी कांद्याची आवक नोव्हेंबरमध्ये होईल. व्यापाऱ्यांच्या मते कांद्याचा साठा भरपूर आहे, पण पावसामुळे वाहतूक करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रातील लासलगाव ही आशियातील कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. गेल्या आठवडय़ात तेथे कांद्याचा भाव किलोला ४५ रुपये होता, तर गतवर्षी तो ३५ रुपयांपेक्षा कमी होता. नाफेड व एनससीएफ यांनी  कांदा २२ रुपये किलो दराने विकणे सुरु ठेवले आहे. मदर्स डेअरी कडून कांदा २३ रुपये ९० पैसे किलो दराने दिला जात आहे. केंद्राचा राखीव साठा खुला करुन राज्यांनी पुरवठा वाढवावा असे सांगण्यात आले आहे.

केंद्राच्या साठय़ाला मागणी :  दिल्ली, त्रिपुरा व आंध्र यांनी केंद्राचा साठा वापरण्यात स्वारस्य दाखवले आहे. केंद्राकडे ५६ हजार टन कांदा साठा असून त्यातील १६ हजार टन कांदा उचलला गेला आहे. दिल्लीत रोज २०० टन कांदा उचलला जात आहे. खरिपात कांद्याचे क्षेत्र कमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.