काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केलेल्या सहकार्याची आठवण करून देत राज्यघटनेच्या निर्मितीचे श्रेय काँग्रेसच्या पारडय़ात टाकण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत केला. राज्यघटनेचे सिद्धांत, आदर्श आज धोक्यात आले आहेत. त्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी वळणाच्या हिंदीत सोनिया गांधी यांनी सत्ताधारी भाजपला, ज्यांचे घटनानिर्मितीत काहीही योगदान नाही. जे राज्यघटनेतील मूल्यांच्या विरोधात आहेत. ज्यांना या मूल्यांविषयी आस्था नाही, तेच आज राज्यघटनेचा जप करीत आहेत, असे सुनावले. भाषणादरम्यान व्यत्यय आणणाऱ्या भाजप खासदारांना हाच ‘इतिहास’ असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
हिवाळी अधिवेशनात असहिष्णुता विरुद्ध धर्मनिरपेक्षता असा संघर्ष होण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणांदरम्यान मिळाले. सोनिया गांधी म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनोखी प्रतिभा व क्षमता ओळखून काँग्रेसनेच त्यांना संविधान सभेत आणले होते. संविधान सभेला पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद व सरदार वल्लभभाई पटेल यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. परिणामस्वरूप लवचीक राज्यघटनेची निर्मिती झाली. आज (संविधान दिवस) आंनदाचा दिवस असला तरी दु:खाचा दिवसही आहे. कारण ज्या आदर्श व सिद्धांतानी आम्हाला गेल्या कित्येक दशकांपासून प्रेरित केले आहे; त्यावर संकट दाटले आहे. त्यावर जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घडणाऱ्या घटना या मूल्यांविरोधात असल्याचे सांगत सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षपणे असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर सरकारवर टीका केली. ज्यांचे काहीही योगदान नाही तेच राज्यघटनेप्रति वचनबद्ध असल्याचे सांगत आहेत. यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते? दादरी, पुरस्कार वापसी आदी कोणत्याही घटना-प्रसंगाचा उल्लेख न करता सोनिया गांधी यांनी छोटेखानी भाषणादरम्यान सरकारवर टीका केली.