माझी प्रार्थना आहे, की या देशात स्त्रीने जन्म घेऊ नये. येथे प्रत्येक ठिकाणी मूर्खच भेटतात, अशी हताश प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील प्रशिक्षणार्थी आयएएस महिला अधिकारी रिजू बाफना यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यक्त केली आहे.
मानवाधिकार आयोगाच्या सदस्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करीत रिजू बाफना यांनी तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली होती. या प्रकरणात रिजू बाफना जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात पोहोचल्या आणि त्याचा अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
जबाब नोंदविताना न्यायालयाच्या खोलीत वकिल आणि इतर काही लोक उपस्थित होते. एवढ्या लोकांसमोर जबाब नोंदवण्यासाठी संकोच वाटल्यामुळे न्यायालयातील इतरांना तिथून जाण्यास सांगावे, अशी विनंती बाफना यांनी न्यायाधीशांना केली. पण न्यायाधीश बाफना यांच्या विनंतीवर काही बोलण्याआधीच न्यायालयाच्या खोलीत उपस्थित असलेल्या वकिलांनी बाफना यांना सुनावले. ‘तुम्ही अधिकारी असाल तुमच्या ऑफिसमध्ये, न्यायालयात नाही’, असे उत्तर वकिलांनी दिल्याचे बाफना यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी आयएएस अधिकारी असल्यामुळे नाही तर एक महिला असल्याने ही विनंती करत असल्याचे सांगितले तरीही वकिलांनी वाद घातला आणि त्यानंतर तेथून निघून गेले. एवढेच नाही तर न्यायाधीशांनी, ‘तुम्ही तरुण आहात. त्यामुळे अशा बाबींची मागणी करीत आहात’, असे सांगितले. त्यामुळे मी फक्त हीच प्रार्थना करेन की, या देशात कोणीही स्त्री जन्म घेऊ नये. इथे प्रत्येक पावलावर मूर्ख बसले आहेत, असे मत बाफना यांनी फेसबुकवर व्यक्त केले. परंतु, पोस्ट काही मिनिटांत व्हायरल होताच त्यांनी रात्री उशीरा नवी पोस्ट करून खेद देखील व्यक्त केला. रागाच्या भरात आपण काय लिहिले, हेच कळले नाही. एका नराधमासाठी संपूर्ण देशाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. माझा देशावर पूर्ण विश्वास आहे, असे रिजू बाफना यांनी म्हटले आहे.