भारत-पाकिस्तान संबंधात २७ फेब्रुवारीला कमालीचा तणाव निर्माण झाला होता. मिग-२१ बायसनचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्याशी संपर्क साधला. भारतीय वैमानिकाला इजा पोहोचल्यास आक्रमक पावले उचलली जातील अशी धमकी त्यांनी असीम मुनीर यांना दिली होती.

त्यादिवशी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी परस्परांवर क्षेपणास्त्र डागण्याची तयारी केली होती असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. नवी दिल्लीतील या सर्व घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धस्मान यांनी वैमानिकांच्या सुटकेबद्दल मुनीर यांच्याशी चर्चा केली. राजस्थानमध्ये भारताने छोटया पल्ल्याची जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या १२ क्षेपणास्त्रांची तैनाती केली होती. त्याबद्दलही दोघांमध्ये चर्चा झाली. अनिल धस्माना यांच्या प्रमाणेच एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसएस जॉन बोलटॉन आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी हॉटलाइनवरुन चर्चा केली.

अभिनंदन वर्थमान यांना शारीरीक इजा पोहोचवली तर हे भारत अजिबात सहन करणार नाही असे डोवाल यांनी बोलटॉन आणि पॉम्पिओ यांना स्पष्ट केले होते. कुठल्याही अटी आणि शर्तीशिवाय इम्रान खान सरकारने अभिनंदन वर्थमान यांची सुटका करावी यासाठी डोवाल आणि धस्माना यांनी संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांबरोबही चर्चा केली होती.

भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयार आहे तसेच भारताने १२ क्षेपणास्त्रे सज्ज ठेवल्याचे डोवाल यांनी बोलटॉन यांना सांगितले होते का ? या प्रश्नावर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नऊ लक्ष्यांवर भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो अशी भिती पाकिस्तानातच्या सरकारी आणि लष्करी नेतृत्वाला वाटत होती. इस्लामाबादमधील सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे म्हटले आहे.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारतातील १३ लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी केली होती. २७ फेब्रुवारीला रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हल्ला होईल असे पाकिस्तानी नेतृत्वाचा अंदाज होता. भारताकडून मिसाइल हल्ला होण्याच्या भितीमुळे पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीमधील लष्करी तळ, रहिवाशी वसाहतींमध्ये पूर्णपणे काळोख करण्याचे आदेश दिले होते. लाहोरमधील असकारी हाऊसिंग सोसायटी आणि कराचीमधील मालीर कॅन्टॉनमेंटमधील लोकांनी ही माहिती दिली. अण्वस्त्राबद्दल माहिती नाही पण विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना इजा पोहोचल्यास कारवाई करण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदींनी दिले होते. भारत त्यादृष्टीनेच मिसाइल हल्ल्यासाठी तयार होता असे मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या सूत्राने सांगितले.