काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९८४ च्या शीख दंगलप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय वादंग सुरु झाले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, जर राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे शीखांचा नरसंहार झालाच नव्हता तर मी म्हणेन त्यांचे वडील आणि आजीची हत्या नव्हे तर त्यांचा मृत्यू सामान्य हृदयविकाराने झाला होता.


राहुल गांधी ब्रिटनमध्ये म्हणाले होते की, ‘१९८४ची शीख दंगल ही मोठी दुःखद घटना होती. त्याचा काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नव्हता’ राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. कौर म्हणाल्या, राहुल गांधींच्या मते जर शीख नरसंहार झालाच नव्हता तर आज मी म्हणते की, त्यांची आजी (इंदिरा गांधी) आणि त्यांचे वडील (राजीव गांधी) यांची हत्या झाली नाही, तर या दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.

हरसिमरत कौर यांच्याआधी त्यांचे पती आणि शरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, राहुल गांधी यांनी आपल्या या वक्तव्याच्या माध्यमांतून स्पष्टपणे संदेश दिला आहे की, हे हत्याकांड घडवून आणलेल्यांच्या बाजूने ते आहेत. राहुल यांच्या या वक्तव्याने दंगल पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्यांना स्पष्टीकरण द्वावे लागत आहे. राहुल यांची पाठराखण करताना पी. चिदंबरम म्हणाले, तेव्हा पक्ष सत्तेत होता आणि ही घटना खूपच भयानक होती. यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत माफी मागितली आहे. यासाठी राहुल गांधींना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. त्यावेळी ते केवळ १३ किंवा १४ वर्षांचे होते. त्यांनी कोणालाही दोषमुक्त म्हटलेले नाही.