बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूने लागला नाही तरीही तो शांतपणे स्वीकारा असं आवाहन मौलाना कस्बे सादिक यांनी केलं आहे. शिया धर्मगुरू मौलाना कस्बे सादिक यांचं हे वक्तव्य  ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे.  शिया परिषदेमध्ये ते बोलत होते. बाबरी मशिद आणि अयोध्या राम मंदिर प्रकरणाची सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी ५ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांसाठी हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. अशात आता मुस्लिमांनी निर्णय शांतपणे स्वीकारावा असं आवाहन शिया धर्मगुरू मौलाना कस्बे सादिक यांनी केलं आहे.

बाबरी मशिद आणि अयोध्या वादावर नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवजांचे भाषांतर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. मूळ कागदपत्रे आणि दस्तऐवज हे संस्कृत, पारशी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये आहे. त्यांच्या भाषांतराचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असं सुन्नी वक्फ बोर्डानं सुनावणीवेळी सांगितलं. त्यावर न्यायालयानं दस्तऐवजाच्या भाषांतरासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मौलाना कस्बे सादिक यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.

वादग्रस्त बाबरी आणि अयोध्या प्रकरणी शिया वक्फ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरीच्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यात यावी असं याआधीच म्हटलं आहे. याशिवाय राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असं देखील या प्रतिज्ञापत्रात शिया वक्फ बोर्डाने म्हटले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता आहे.

‘बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत बातचीत करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे,’ असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मौलाना कस्बे सादिक यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय. गेल्या अनेक वर्षांपासून बाबरी आणि अयोध्या राम मंदिर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी सोबत बसून निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं याआधीच म्हटलं आहे. आता शिया वक्फ बोर्डानं दोन पावलं मागे घेतली आहेत त्यामुळे हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.