गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालावेळी काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर दिसून आली. मात्र टूजी घोटाळा आणि आदर्श घोटाळ्यात दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. अशात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. खोटे बोला पण रेटून बोला हे धोरण असेला पक्ष म्हणजे भाजप आहे या आशयाचा ट्विट त्यांनी केला. तसेच भाजपने एखादा सिनेमा काढावा तो चांगला चालेल असा खोचक सल्लाही राहुल गांधी यांनी दिला. भाजपकडे जर एखाद्या सिनेमाची फ्रॅन्चाईझी असती तर त्यांनी त्या सिनेमाचे नाव ‘लाय हार्ड’ ठेवले असते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सोमनाथाचे दर्शन घेतले. तसेच पूजाही केली. गुजरात निवडणुकांच्या वेळी जेव्हा राहुल गांधी यांनी सोमनाथाचे दर्शन घेतले होते तेव्हा त्यांचे नाव अहिंदू रजिस्ट्ररमध्ये नोंदवण्यात आले. ज्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता. मात्र आज त्यांनी याच मंदिरात येऊन पूजा केली. माझी आजी म्हणजेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी शिवभक्त होत्या असे उदाहरण देऊन त्यांनी या वादाला उत्तरही दिले होते.

गुजरात निवडणूक निकालांचा विचार करता काँग्रेसने गेल्या वेळच्या तुलनेत १६ जागा जास्त मिळवल्या. तसेच भाजप आणि काँग्रेसमध्ये निकालाच्या दिवशी चांगलीच चढाओढही बघायला मिळाली. आता आज राहुल गांधी यांनी भाजपला खोटे बोलणारा पक्ष म्हणत टीका केली आहे. यावर पुन्हा एकदा भाजप नेत्यांकडून उत्तरे येण्याची शक्यता आहे.