17 January 2019

News Flash

पक्षाचे दोषी नेतेच उमेदवार कसे निवडू शकतात?: सुप्रीम कोर्ट

गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी

सर्वोच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)

जर गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तर पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार कसे निवडू शकतात, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोमवारी विचारला आहे. तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे.

गुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. दोषी ठरलेल्या नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व देखील करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या वतीने अमित शर्मा यांनी बाजू मांडली. निवडणूक आयोगाने अश्विनी उपाध्याय यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. शर्मा म्हणाले, निवडणूक आयोग १९९८ पासून यासाठी प्रयत्न करत आहे. पण दोषी व्यक्तींना पक्षाचे नेतृत्व करण्यापासून रोखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही. यासाठी संसदेने विद्यमान कायद्यांध्ये सुधारणा करणे गरजेचे असून या कायद्याची अंमलबजावणी होईल याकडे निवडणूक आयोग लक्ष देईल, असे शर्मा यांनी सांगितले. किमान पाच वर्षे शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे आरोप असलेल्या आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेल्या लोकांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी शिफारसही केंद्र सरकारला केली असल्याचे आयोगाच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले.

जर एखाद्यावर निवडणूक लढवण्यास बंदी असेल तर तो पक्षाचे नेतृत्वही करु शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. ‘दोषी ठरलेली व्यक्ती राजकीय पक्षाची स्थापना करुन पक्षाचे नेतृत्व करु शकते’, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. लालूप्रसाद यादव, ओ पी चौटाला आणि शशिकला हे गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरले असले तरी त्यांच्या राजकीय पक्षातील मोठे पद अजूनही कायम आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली. ‘दोषी व्यक्ती दुसऱ्यांची मदत घेऊन शाळा देखील सुरु करु शकते. यात त्याला काहीच अडचण देखील येणार नाही. पण ते जेव्हा देशाच्या व्यवस्थेत येण्याचा प्रयत्न करतील ती चिंतेची बाब आहे, असे कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे मत मांडले.

First Published on February 13, 2018 9:57 am

Web Title: if convicted person cannot contest elections then how can he head political party asks supreme court