जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घालून दिलेल्या निकषांनुसार हवेचा दर्जा साध्य करण्यात भारताला यश आले, तर भारतीयांचे जीवनमान सरासरी चार वर्षांनी वाढेल. शिकागो विद्यापीठ आणि हार्वर्ड केनेडी स्कूल यांच्या ‘रोडमॅप टुवर्ड्स क्लीनिंग इंडियाज एअर’ या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या अहवालात भारतातील हवेच्या प्रदूषणाची गंभीर स्थिती मांडण्यात आली असून केवळ हवेच्या प्रदूषणामुळे भारताचे ०.५ लाख कोटींहूनही अधिक आर्थिक नुकसान होत असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. तर खराब हवेमुळे देशातील हजारो-लाखो लोकांना अल्पायुष्य आणि आयुष्यभर आजारपणाचा सामना करावा लागत आहे.

यामध्ये हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काही शिफारशीही करण्यात आलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या दर्जासाठी पीएम२.५ या प्रदूषकाचे प्रमाण घनमीटरमागे वार्षिक सरासरी १० ग्रॅम तर २४ तासांसाठी सरासरी २५ ग्रॅम असे निश्चित केले आहे. पीएम१० या प्रदूषकाबाबत हे प्रमाण अनुक्रमे २० ग्रॅम व ५० ग्रॅम आहे. देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ६६ कोटी भारतीय पीएम२ या प्रदूषकाचे प्रमाण निकषाहून अधिक असलेल्या भागात राहत असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.