16 October 2019

News Flash

रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ

आम्हाला सांप्रदायिकतेच्या नावाने दूषणे दिली जातात

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath : आम्ही देशाची सांस्कृतिक एकता बळकट करण्यासाठी प्रयत्न करतोय तर आमच्यावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. आम्ही 'गर्व से कहो हम हिंदू है' असं म्हटलं तरी आम्हाला सांप्रदायिकतेच्या नावाने दूषणे दिली जातात, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील सत्तारोहणापासूनच धडाकेबाज आणि वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू सणांच्या संदर्भात नवी भूमिका मांडली आहे. जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना रोखू शकत नसेन, तर राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका, असे सांगण्याचा कोणताही हक्क मला नाही, असे त्यांनी म्हटले. ते बुधवारी लखनऊ येथील एका कार्यक्रमात बोलत होते. आगामी काळात उत्तर प्रदेशात होणाऱ्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विचार मांडले. कावड यात्रेच्या काळात सरकारकडून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी माईक, डीजे आणि इतर वाद्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी हा मुद्दा माझ्यासमोर उपस्थित केला. तेव्हा मी सर्व अधिकाऱ्यांना एवढेच सांगितले की, प्रत्येक ठिकाणी माईकवर बंदी असेल, असा आदेश तुम्ही माझ्यासमक्ष मंजुर करा. यामधून कोणतीही जागा वगळू नका. कोणत्याही धर्मस्थळाचा आवाज संबंधित परिसराबाहेर गेलाच नाही पाहिजे, हे निश्चित करा. त्यानंतर या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी तुम्हाला शक्य आहे का, हे मला सांगा. ते शक्य नसेल तर मग कावड यात्रेवर लादण्यात आलेले निर्बंधही आम्ही मान्य करणार नाही. ही यात्रा नेहमीच्या पद्धतीनेच होईल, असे योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितले.

‘प्रेरणा जनसंचार एवं शोध संस्थान’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे हे देखील उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सरळसरळपणे उत्सव काळात लादण्यात येणाऱ्या आवाजी निर्बंधाविषयी नाराजी व्यक्त केली. अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी मला कावड यात्रेदरम्यान माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीमला बंदी करण्यात आल्याचे सांगितले. परंतु, मी त्यांना एकच प्रतिप्रश्न केला की, ही कावड यात्रा आहे का शव यात्रा? कावड यात्रेत बाजा, डमरू, ढोल, चिमटे ही वाद्ये वाजली नाहीत, लोक नाचले-गायले नाहीत, तर यात्रेला अर्थच काय उरला?. आपल्या देशात प्रत्येकाला त्याचा सण साजरा करायचे स्वातंत्र्य आहे. आम्ही या प्रत्येकाच्या पाठिशी उभे राहू. तुम्ही नाताळ साजरा करा, तुम्हाला या देशात कधी त्यासाठी कुणी रोखलेय का?, तुम्ही कायद्याच्या कक्षेत राहून निश्चिंतपणे नमाजही पठण करु शकता. तुम्हाला कुणीही रोखणार नाही. मात्र, कायद्याचे उल्लंघन केले तर कुठे ना कुठे संघर्ष हा अटळ आहे, असा सूचक इशाराही योगी आदित्यनाथ यांनी दिला.

तसेच त्यांनी भाजप जातीयवादाचे राजकारण करत असल्याचा आरोपही फेटाळून लावला. आम्ही देशाची सांस्कृतिक एकता बळकट करण्यासाठी प्रयत्न करतोय तर आमच्यावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. आम्ही ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं म्हटलं तरी आम्हाला सांप्रदायिकतेच्या नावाने दूषणे दिली जातात, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

First Published on August 17, 2017 8:14 am

Web Title: if i cannot stop namaz on road i have no right to stop janmashtami at thana yogi adityanath