पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढणार आहे, हे माहिती असते तर मी नक्कीच त्यांची मदत केली असती, असे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी सांगितले. ते बुधवारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी आझम खान यांनी म्हटले की, पंतप्रधानांची आई बँकेच्या रांगेत उभी राहणार आहे, हे माहिती असती तर मीच त्यांना रांगेत उभे राहून पैसे काढून दिले असते. मी त्यांना अशाप्रकारे रांगेत उभे केले नसते, असे आझम खान यांनी म्हटले.

सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सध्या देशभरातील बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी लोकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. या गैरसोयीमुळे मोदी सरकारवर मोठी टीकाही होत आहे. या पार्श्वभूमीवर काल नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांनी गुजरातच्या गांधीनगर येथील बँकेत रांग लावून पैसे काढले होते. हिराबेन त्यांच्याकडे असणाऱ्या पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या रायसेन शाखेत दाखल झाल्या होत्या. यावेळी हिराबेन यांना पाहण्यासाठी प्रसारमाध्यमांसह लोकांची मोठी गर्दी झाली होती.

कोणतीही सवलत न घेता हिराबेन बँकेत आल्या होत्या. अतिशय वयोवृद्ध असणाऱ्या हिराबेन मोदींना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आतापर्यंत भाजपचा एकही मोठा नेता नोटा बदलून घेण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभा राहिलेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसालाच मनस्ताप होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र मोदींची वयोवृद्ध आईच बँकेच्या रांगेत सर्वसामन्य माणसांसारखी उभ्या राहिल्याने विरोधकांचा दावा फुसका ठरण्याची शक्यता होती. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर विरोधकांनी पुन्हा मोदींवर हल्ला चढवला. ‘मी माझ्या आईला कधीच रांगेत उभे केले नसते, मी स्वतः रांगेत उभं राहण्यासाठी गेलो असतो’ अशी टीका केजरीवाल यांनी केली होती.