महाराष्ट्र आणि हरयाणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान, हरयाणात एका भाजपाच्या उमेदवाराने मतदारांना भलतेच आश्वासन दिले आहे. मला आमदार बनवल्यास तुमची नशापाणी, वाहतूक दंड प्रकरणी अडचणी राहणार नाहीत, असे त्याने म्हटले आहे.

हरयाणातील फतेहाबाद मतदारसंघातील दूदाराम बिश्नोई या भाजपाच्या उमेदवाराने एका सभेदरम्यान मतदारांना हे अजब आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, “आपण सर्वांनी मला इथून आमदार बनवून विधानसभेत पाठवलं तर तुमच्या नशेसंबंधी, शिक्षणासंबंधी, वाहतूक दंडासंबंधी सारख्या छोट्या-मोठ्या अडचणी संपतील.

भाजपा उमेदवाराने उघड उघड कायद्यांविरोधात केलेल्या या विधानावर सोशल मीडियातून टीका करण्यात आली आहे. सत्ता मिळाल्यानंतर नेते मंडळी कायद्याला आपला नोकर समजतात, अशी प्रतिक्रिया एका ट्विटर युजरने दिली आहे. समाजसेवा केवळ निवडणूकीच्या वेळीच करायची नसते, अशा शब्दांत एकाने या नेत्याला सुनावले आहे. अशा लोकांना खरतंर मतंच द्यायला नको कारण हे कधी विकास करु शकत नाहीत. त्यांचा विचारच सांगतो ते कसे आहेत, असेही एकाने ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

हरयाणातील काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांचे दूदाराम बिश्नोई हे चुलत भाऊ आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला असून भाजपाने त्यांना फतेहाबद येथून उमेदवारी दिली आहे.