भारताने एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही दोन पावले पुढे टाकू. असा कोणताच मुद्दा नाही जो सोडवला जाऊ शकत नाही. पण मुद्दा सोडवण्यासाठी नेतृत्वाची इच्छाशक्ती हवी असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कर्तारपूर मार्गिकेच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणाले.

गुरुदासपूर जिल्हयातील डेरा बाबा नानक व पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. मदीनापासून चार किलोमीटर अंतरावर असूनही काही मुस्लिमांना दर्शनासाठी जात येत नाही. पण जेव्हा त्यांना दर्शनाची संधी मिळते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो. तसाच आनंद मला आज कर्तारपूर साहिब मार्गिकेच्या निमित्ताने दिसत आहे असे इम्रान खान म्हणाले.

मी २१ वर्ष क्रिकेट खेळलो. क्रिकेट खेळताना मी दोन प्रकारचे लोक पाहिले. काही जणांना पराभवाची भिती वाटते तर दुसरे ते असतात जे विजयाशिवाय दुसरा कुठलाच विचार करत नाहीत. राजकारणातही तसेच दोन प्रकारचे नेते असतात. काही नेत्यांना पराभवाची भिती वाटते तर दुसऱ्या प्रकारचे नेते देशासाठी कामामध्ये अखंड बुडून गेलेले असतात. त्याशिवाय ते दुसरा कुठलाच विचार करत नाहीत असे इम्रान म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानने मागच सर्व काही विसरुन पुढे गेलं पाहिजे. आपला भूतकाळ आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे.

आपल्या भविष्याकडे लक्ष दिलं पाहिजे. युरोपियन देश त्यांच्या भूतकाळातून शिकले आपल्यालाही शिकण्याची गरज आहे असे इम्रान म्हणाले.
आम्हाला भारताबरोबर चांगले नागरीसंबंध हवे आहेत. असा कुठला मुद्दा आहे जो चर्चेने सोडवला जाऊ शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणवस्त्र संपन्न देश आहेत. आपण शांततेचा विचार केला पाहिजे. दोन्ही देशांमध्ये शांतता नांदणे शक्य आहे असे इम्रान म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्दा आहे. जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात मग भारत-पाकिस्तान का एकत्र येऊ शकत नाही ? असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला. कर्तारपूर मार्गिका खुली झाल्यास दोन्ही देशांमध्ये गरीबी दूर होण्यास मदत होईल असे इम्रान म्हणाले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना युद्धा करायचे नाही मग मैत्री शिवाय दुसरा कुठला मार्ग उरतो असे इम्रान खान म्हणाले.