दिल्लीतील लोकांनी अरविंद केजरीवाल यांचा खरा चेहरा पाहिला आहे. त्यामुळे आता येथील जनता त्यांच्या खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात सापडणार नाही, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितले. येत्या २३ एप्रिलला दिल्लीत तीन महानरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दि इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. आगामी निवडणुकीत दिल्ली महानगरपालिकेत भाजपची सत्ता येईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सत्तेत आल्यास भाजप दिल्ली महानगरपालिकेला जाणवणारी निधीची अडचण दूर करेल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात दिल्लीत सफाई कामगारांनी पाचवेळा संप केला आहे. त्यामुळे दिल्लीतील जनतेला कचऱ्याच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत आहे. भाजप सत्तेत आल्यास हे सगळे थांबणार का, असा प्रश्न मनोज तिवारी यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी निधीच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे म्हटले. मात्र, इतके सगळे होऊनही दिल्लीतील सफाई कामगार कचरा उचलत नाहीत किंवा नेत्यांच्या तोंडावर नेऊन फेकत नाहीत, ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, केजरीवाल आणि काँग्रेस पक्षातील लोकांनी सफाई कामगारांचे वेतन थांबवले तर ते लोक त्यांच्या तोंडावरही कचरा फेकायला कमी करणार नाहीत. सफाई कामगार हे गरीब वर्गातील आहेत. आपला पगार वेळेवर मिळावा, एवढीच अपेक्षा त्यांना आहे. मात्र, पगार वेळेवर मिळाला नाहीतर ते काय करतील, असा सवाल तिवारी यांनी विचारला. यावेळी मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांनी ईव्हीएम मशिन्समधील फेरफारासंदर्भातील आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. केजरीवाल हे स्वत:चा पराभव न स्विकारू शकणारी व्यक्ती आहे. यावर आम्ही काय बोलणार?, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला.