दलित कार्यकर्ते आणि गुजरातमधील वडगामचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. जर मायावती यांनी लोकसभा निवडणुकीत नेतृत्व केले तर नरेंद्र मोदींची घरवापसी निश्चित असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि अमित शाह नव्हे तर कबीर, बुद्ध आणि रविदास यांची विचारधारा चालेल, असे ठणकावून सांगितले. मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकशाही वाचवण्यासाठी मोदी, योगी आणि अमित शाह यांच्या त्रिकुटाला नेस्तनाबूत केले पाहिजे. यासाठी सर्व वर्गातील जाती आणि समुदायातील लोक एका मंचावर आली पाहिजेत.

रोहित वेमुलाची हत्या करणारे निवडणूक जवळ येताच दलितांवर प्रेम असल्याचे दाखवतात. दलितांना भुलवण्यासाठी संसदेत विधेयके आणली जात आहेत. पण दलित आता त्यांच्या सापळ्यात अडकणार नाही. दलित अस्पृश्य असल्याचे केंद्र सरकारने साडेचार वर्षांत आपल्या कार्यपद्धतीने दाखवून दिले आहे. दलितांना ना शिकण्याची परवानगी आहे ना शिकवण्याची आणि पुढे जाण्याची असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस-सपा आणि बसपाची आघाडी झाली तर मी त्यात सहभागी होऊन भाजपाविरोधात प्रचार करेन, असे म्हणत मायावती यांनी दलित नेता म्हणून पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.