लोकसभेच्या पाच टप्प्यांची मतदान प्रक्रिया पार पडली असून रविवारी सहाव्या टप्प्याचे मतादन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले असून ते जन्माने ओबीसी असते तर रा.स्व. संघाने त्यांना पंतप्रधान केले असते का? असा सवाल ट्विटरद्वारे केला.

शुक्रवारी मायावती यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गठबंधन हे जातीयवादी असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला मायावती यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. त्यांनी जातीयवादाचा केलेला आरोप हा हास्यास्पद आणि अपरिपक्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जे लोक जातीयवादाच्या अभिशापाने पीडित आहेत तेच जातीयवादी कसे असू शकतील असा सवाल करत मोदी हे जन्मत: ओबीसी नसल्यामुळे त्यांना जातीयवाद सहन करावा लागला नसल्याचे त्या म्हणाल्या.

मोदी हे राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला मागासवर्गीय म्हणून घेत असल्याचा आरोपही मायावती यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये केला आहे. कल्याण सिंह यांच्यासारख्या नेत्याचा रा.स्व.संघाने जे हाल केले, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. मोदी जर जन्मत: ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान केले असते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.