दोन पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सर्व सरकारी सेवा- सुविधा बंद करा, अशी मागणी भाजप खासदाराने लोकसभेत केली. एका पिढीला सुविधा न मिळाल्यास पुढील पिढी याबाबत अधिक जागरुक होईल, असे मतही भाजप खासदारांनी मांडले आहे.

भाजपचे सहारनपूरमधील खासदार राघव लखनपाल शर्मा यांनी शुक्रवारी लोकसभेत खासगी विधेयक मांडले. यात त्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कायदा लागू करावा, अशी मागणी केली. यानंतर भाजपचे झारखंडमधील खासदार रविंद्र कुमार राय यांनी देखील मत मांडले. राय म्हणाले, दोन पेक्षा जास्त अपत्ये असलेल्या पालकांना आणि त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सर्व सरकारी सुविधा, सरकारी योजनांमधून मिळणारे लाभ बंद करावेत.  यात लहान मुलांची काही चूक नाही. पण बेजबाबदार आई-वडिलांमुळे ही वेळ ओढावल्याची जाणीव त्यांना होईल, एका पिढीला असा फटका बसला की त्याचे परिणाम पुढील पिढीवर दिसून येतील, असे राय यांनी सांगितले.

खासगी विधेयक मांडताना शर्मा म्हणाले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० मध्ये सुधारणा करावी. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०१८ तयार करण्याची आवश्यकता आहे. यात दोन अपत्यांची सक्ती करावी, असे शर्मा यांनी सांगितले. तिसऱ्या अपत्याला सरकारी नोकरी आणि निवडणूक लढवता येणार नाही तसेच त्याला सरकारी अनुदानही मिळणार नाही, अशी तरतूद कायद्यात करावी, असे मत त्यांनी मांडले.