रमजानच्या महिन्यांत मतदानाचे दिवस येत असल्याने यावर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिम समुदयाने आक्षेप घेतला आहे. या काळात मतदान नको अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या वादावरुन एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत तारखांवरुन वाद निर्माण करणाऱ्यांना सुनावले आहे. जर रमजानच्या महिन्यात लोकं कामावर जाऊ शकतात, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. तीन राज्य पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. त्यामुळे मुस्लिम नेते आणि मौलवींनी निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आहे. या तारखा बदलल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. या तीन राज्यात अल्पसंख्यकांची लोकसंख्या जास्त आहे. अल्पसंख्यकांनी मतदान करु नये अशी भाजपाची इच्छा आहे. यामुळे आम्ही चिंतीत आहोत. लोक आता ‘भाजपा हटाओ-देश बचाओ’साठी प्रतिबद्ध आहेत, असेही मुस्लिम नेत्यांनी म्हटले आहे.

मात्र निवडणुकांच्या तारखांवरुन उगच वाद उकरून काढला जात असल्याचे ओवेसी म्हणाले आहेत. रमजानमधील निवडणुकांना आपला काहीही आक्षेप नसल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यावरुन राजकारण करणाऱ्यांना ओवेसी यांनी चांगलेच झापले आहे. ‘निवडणुकांच्या तारखांवरुन राजकारण करण्यांना एवढचं सांगेल की तुम्ही मुस्लिम समाचा ठेका घेऊ नका. निवडणुका येतील आणि जातील. मुस्लिम लोक रोजा पाळणार, नमाज पठण करणार आणि रमजानचा पवित्र महिना मोठ्या उत्सहात साजरा करणार,’ असं ओवैसींनी ट्विट केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच रमझानचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं असल्याच मत औवैसींनी व्यक्त केले आहे. ‘रमझानच्या महिन्यात रोजे असतात त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल असा जो दावा केला जात आहे तो एकदम बकवास आहे. असं काहीही होणार नाहीय. उलट मला विश्वास आहे की रमझानमध्ये मुस्लिमांचा उत्साह अधिक असतो त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल,’ असा विश्वास औवैसींनी बोलून दाखवला आहे. पुढे बोलताना, निवडणूक आयोगाला तीन जूनच्या आधी निवडणुका घ्यायच्या असल्याने रमझानमध्येच निवडणुक घ्याव्या लागणार हे उघड आहे. पाच मे ते चार जून रमझान असल्याने त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल अशी तक्रार करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ‘रमजान आणि निवडणुकांच्या तारखांवरुन तक्रार करणारे लोक रोजा असतो तेव्हा कमावर जात नाहीत का?’, असा सवालही औवैसींनी उपस्थित केला आहे. ‘रमजानचे कारण देत निवडणुकांच्या तारखांवरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मुस्लिमांची इतकीच काळजी असेल तर ते उरलेल्या अकरा महिन्यांमध्ये मुस्लिम समजासाठी काय करतात ते सांगावे,’ असंही ओवेसी रमजानवरुन वाद घालण्यांवर टीका करताना म्हणाले आहेत.

रमजानच्या पवित्र महिन्यावरुन राजकारण नको: औवैसी

निवडणूक आयोगाने ६, १२ आणि १९ रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. याच काळात रमजानचा महिना असल्याने काही मुस्लिम संघटनांनी या तारखांना विरोध केला आहे. मात्र या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. रमजान ईदचा दिवस आणि रमजानच्या महिन्यांतील शुक्रवारच्या दिवशी मतदान ठेवण्यात येणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. संपूर्ण रमजानच्या महिन्यांत मतदान प्रक्रिया थांबवणे शक्य नाही. त्याऐवजी सणाचा दिवस अर्थात रमजान ईदचा दिवस आणि या महिन्यांतील शुक्रवारचे दिवस ज्या दिवशी मुस्लिम बांधवांना सामुहिक नमाज पठण करायचे असते या काळात मतदान होणार नाही, असं आयोगाने सांगितले आहे. या स्पष्टीकरणामुळे मुस्लिम समाजाचे समाधान होईल असा विश्वासही आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे.