जर राम मंदिराचा मुद्दा वेळीच सोडवला नाही तर भारताचा सीरिया होईल अशी भीती आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली आहे. रवि शंकर यांचं विधान राम मंदिर – बाबरी मशिद प्रकरणात नवा वाद निर्माण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंडिया टुडे टिव्हीशी बोलताना रवि शंकर यांनी जर राम मंदिराचा मुद्दा सोडवला नाही तर भारताचा सीरिया झालेला आपल्याला बघायला मिळेल असे मत व्यक्त केले.
सध्या रवि शंकर या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या भेटी घेऊन कोर्टाबाहेर सामोपचारानं हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सीरियामध्ये सत्तारूढ अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारविरोधात गेली आठ वर्षे बंडखोरांनी युद्ध छेडले असून प्रचंज प्रमाणात संहार झाला आहे. या यादवीमध्ये 4,65,000 सीरियन मारले गेले आहेत तर 10 लाखांपेक्षा जास्त जखमी झाले व जवळपास सव्वा कोटी सीरियन विस्थापित झाले आहेत.

गेल्या दोन आठवड्यात सीरियन प्रश्न आणखी चिघळला असून एकाच ठिकाणी तब्बल 600 जण बळी गेले आहेत. सीरियाचं उदाहरण देताना रवि शंकर यांनी मुस्लीमांनी अयोध्येवरचा दावा सोडावा असा सल्ला दिला आहे. अयोध्या ही जागा ही मुस्लीमांसाठी श्रद्धास्थान नाही, त्यामुळे त्यांनी सद्भावनेतून अयोध्येवरचा दावा सोडावा असं रवि शंकर म्हणाले आहेत.

वादग्रस्त जागेवर प्रार्थना करण्यास इस्लाममध्ये मनाई असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. तसेच, प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान आम्ही बदलू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. वादग्रस्त जागेवर हॉस्पिटलसारख्या वास्तू उभारण्यासारख्या सूचनांना रवि शंकर यांनी झिडकारलं आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म या जागी झाला अशी हिंदूंची श्रद्धा आहे. मुघल काळात या जागी मशिद उभारण्यात आली जी हिंदू जमावानं 6 डिसेंबर 1992 मध्ये जमीनदोस्त केली. तेव्हापासून हा प्रश्न धगधगत आहे. गेल्या वर्षभरात रवि शंकर देशभरातल्या 500 नेत्यांना भेटले असून त्यांनी या नेत्यांशी चर्चा केली आहे व हा मुद्दा कोर्टाबाहेर सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

काही लोक माझ्या प्रयत्नांना विरोध करत आहेत, कारण वाद-विवादावर त्यांचा उत्कर्ष होतो असं ते म्हणाले आहेत. तसेच, कोर्टाचा निकाल सगळ्यांना मान्य होणार नाही ही भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मध्यंतरी, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे निलंबित सदस्य सय्यद सलमान हुसेन नकवी यांनाही रवी शंकर भेटले होते. नकवींनी मशिद दुसरीकडे हलवणं इस्लामविरोधी नसल्याचं विधान केलं होतं. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. रवि शंकर यांनी नकवींना पैसे दिल्याचा आरोपही झाला, जो रवि शंकर यांनी फेटाळला आहे. मी नकवींना कधीही पैसे दिलेले नाहीत असं रवि शंकर म्हणाले आहेत.