अखिल भारत हिंदू महासभेने उत्तर प्रदेश मेरठमध्ये देशातील पहिले हिंदू न्यायालय स्थापन केले आहे. स्थापनेपासूनच चर्चेत आलेल्या या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुरुवातीलाच खळबळजनक वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली नसती तर ते काम मी केले असते असे या स्वयंघोषित न्यायालयाच्या महिला न्यायाधीश पूजा शकुन पांडे यांनी म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. नथुराम गोडसेंची पूजा करण्याचा मला आणि अखिल भारत हिंदू महासभेला सार्थ अभिमान आहे असे त्या म्हणाल्या.

नथुराम गोडसेनेच ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीत महात्मा गांधींची हत्या केली होती. पूजा पांडे या समाजसेविका असून त्या गणिताच्या प्राध्यापक आहेत. तिहेरी तलाक आणि निकाह हलाला प्रथेच्या बळी ठरलेल्या मुस्लिम महिलांनी हिंदू धर्मात प्रवेश करावा असे आवाहन केल्यानंतर पूजा पांडे चर्चेत आल्या होत्या.

गोडसेंनी गांधींना मारले नसते तर ते काम मी केले असते हे मी अभिमानाने म्हणते. आजही देशाच्या विभाजनाचा विचार करणारे गांधी असतील तर समाजात गोडसेदेखील आहेत हे लक्षात ठेवावे असे पांडे म्हणाल्या. मुस्लिमांमधल्या शरीया कोर्टाच्या धर्तीवर आणखी हिंदू न्यायालये स्थापन होतील असे त्या म्हणाल्या.

जमिनीचे वाद, संपत्ती आणि लग्नासंबंधींच्या वादांवर हिंदू न्यायालयात सुनावणी होईल असे एबीएचएमचे उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी सांगितले. न्यायालयीन कामकाजासंदर्भातले नियम दोन ऑक्टोंबर रोजी जाहीर केले जातील असे त्यांनी सांगितले. दरम्यान हिंदू न्यायालयासंदर्भात अलहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली असून त्यासंबंधी आणखी माहिती मागितली आहे. हायकोर्टाने मेरठच्या डीएमना सुद्धा नोटीस बजावली असून ११ सप्टेंबरला यासंबंधी सुनावणी होणार आहे.