सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात(CAA) राजधानी दिल्लीच्या शाहीनबागमध्ये सुरू असलेले विरोध प्रदर्शन दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाचा मुद्दा बनलाय. ‘जर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार बनले तर एका तासात शाहीनबागचा परिसर रिकामा करु’, असं विधान भाजपाचे खासदार परवेश वर्मा यांनी केलंय.

दिल्लीच्या शाहीनबागमध्ये जवळपास गेल्या 40 दिवसांपासून विरोध प्रदर्शन सुरू असून सध्या शाहीनबाग हा राजकारणाचा आखाडा बनला आहे. आज तकच्या वृत्तानुसार, एका प्रचारसभेत बोलताना भाजपाचे खासदार वर्मा म्हणाले, “ही छोटी-मोठी निवडणूक नाहीये, तर देशाला एकत्र आणणारी आणि स्थिरता देणारी देणारी निवडणूक आहे. 11 तारखेला जर भाजपाचं सरकार बनलं तर एका तासाच्या आत शाहीनबागमध्ये एकही व्यक्ती दिसणार नाही. जर दिसला तर मीपण इथेच आहे आणि तुम्हीही इथेच आहात. माझे शब्द लक्षात ठेवा”. पुढे बोलताना वर्मा यांनी सरकारी जमिनीवरील मशिदींच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “जर दिल्लीत आमचं सरकार बनलं तर 11 तारखेनंतर केवळ एका महिन्याचा वेळ मला द्या. माझ्या लोकसभा क्षेत्रात जेवढ्या मशिदी सरकारी जमिनीवर बनल्यात त्या सर्व मशिदी हटवेल”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपाकडून शाहीनबागचा मुद्दा दिल्ली निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. नुकत्याच झालेल्या एका प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदानावेळी इतक्या जोरात इव्हीएमचं बटण दाबा की करंट शाहीनबागपर्यंत बसला पाहिजे असं विधान केलं होतं. भाजपाकडून शाहीनबागच्या मुद्द्यावरुन ‘आप’ आणि काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलं जात आहे. सोमवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी, ‘शाहीनबागमध्ये देशाचं विभाजन करणारे बसलेत, ती तुकडे-तुकडे गँग आहे’ असं म्हटलं होतं.