राजकारणाच्या मैदानात उतरलेले दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांची भाजपाबरोबर जवळीक असली तरी हळूहळू त्यांच्या भाजपाबद्दलच्या भूमिकेत बदल होताना दिसत आहे. अन्य पक्षांना भाजपा धोकादायक पक्ष वाटत असेल तर तसे असेलही असे मत रजनीकांत यांनी सोमवारी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भातही त्यांची भूमिका बदलली आहे. आधी व्यवस्थित रिसर्च करुन नंतर अंमलबजावणीचा निर्णय घ्यायला हवा होता असे मत त्यांनी व्यक्त केले. चेन्नई विमानतळाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. नोटाबंदीचा निर्णय योग्य रिसर्च करुन घ्यायला हवा होता. अंमलबजावणीमध्ये चूक झाली असे रजनीकांत म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रजनीकांत यांनी टि्वटरवरुन त्यांचे कौतुक केले होते. आता मात्र त्यांनी निर्णय चुकल्याचे म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींची मुदतीआधी सुटका करण्यासाठी तामिळनाडू सरकारने राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रासंदर्भात पुढील हालचाल करण्यास केंद्राने नकार दिला आहे. त्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी आताच इथे पोहोचलो आहे असे त्यांनी सांगितले. या हत्या प्रकरणातील सात दोषी २७ वर्षापासून तुरुंगात आहेत.