राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत एका आमदाराने नाराजी दर्शवली आहे. निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधीच घेणार असतील तर आमदारांचे मत जाणून घेण्यात कोणताच अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार विश्वेंद्र सिंह यांनी दिली आहे.

पक्ष मुख्यालयात बुधवारी बोलावण्यात आलेल्या आमदारांच्या बैठकीत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये आमदारांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्याचे अधिकारी काँग्रेस अध्यक्षांना दिले आहेत. डिग-कुम्हेर येथील नवनिर्वाचित आमदार विश्वेंद्र सिंह यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. जर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा निर्णय पक्षाच्या हायकमांडकडून होणार असेल तर व्यक्तिगत स्तरावर आमदारांचे मत जाणून घेण्याला काहीच अर्थ नाही. मी माझा वेळ पक्षाच्या निरीक्षकांना मत सांगण्यास का वाया घालवू असा असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.

मी या विचारांशी सहमत नाही. मी नाराज किंवा नाखूश नाही. पक्षाध्यक्षांना निर्णय घेण्याच्या अधिकृत प्रस्तावाशी मी सहमत आहे. पण अशावेळी वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतला जाणार असेल तर पक्षाच्या निरीक्षकांकडून वैयक्तिक स्वरुपात जाणून घेण्यात आलेल्या मताला काहीच अर्थ राहत नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, आमदारांकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधींनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीला बोलावले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी राहुल गांधी या दोन्ही नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री जाहीर करतील. राजस्थानमधील १९९ जागांपैकी ९९ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. बसपाला ६ ठिकाणी यश मिळाले आहे. त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.