ममता, मायावती, अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र आले तर मोदींची हार होणार हे निश्चित आहे असा अंदाज इंडिया टुडे आणि कार्वे यांनी  घेतलेल्या जनमत चाचणीत नोंदवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका जाहीर होऊ शकतात. याच अनुषंगाने इंडिया टुडेने एक जनमत चाचणी घेऊन देशाचा सध्याचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

याच जनमत चाचणीनुसार ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे सगळे एकत्र आले तर मोदींना हरवणं सहज शक्य आहे असा अंदाज जनतेने वर्तवला आहे. राहुल गांधी हे मायावती आणि अखिलेश यादव यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरले तसेच ममता बॅनर्जींनाही काँग्रेसच्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलं तर ही निवडणूक मोदींना जड जाऊ शकते. या निवडणुकांमध्ये मोदींचा आणि पर्यायाने भाजपाचा पराभव होऊ शकतो असा अंदाज या जनमत चाचणीतून समोर आला आहे.

युपीएला जर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आणि बहुजन समाजवादी पार्टीची साथ मिळाली तर यूपीएच्या 269 जागा लोकसभेसाठी निवडून येतील असा अंदाज या जनमत चाचणीनुसार व्यक्त होतो आहे. तर 219 जागा भाजपाप्रणित एनडीएला मिळतील असाही अंदाज या जनमत चाचणीद्वारे समोर आला आहे. ही जनमत चाचणी एकूण 13 हजार 179 लोकांचे मत विचारात घेऊन तयार करण्यात आल्याचे इंडिया टुडे आणि कार्वे यांनी जनमत चाचणीत स्पष्ट केले आहे.