रामजन्म अयोध्येत झाला ही श्रद्धेची बाब असेल, तर मग तिहेरी तलाक का नाही, असा सवाल मुस्लिम बोर्डाने मंगळवारी उपस्थित केला. बोर्डाच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रामजन्म अयोध्येत झाल्याच्या मुद्द्यावरून विविध पातळ्यांवर चर्चाही रंगते. हा हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याबाबत फारसा प्रतिवाद होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तिहेरी तलाक हाही मुस्लिम धर्मातील श्रद्धेचा विषय असल्याने या दोन्ही विषयांत सर्वोच्च न्यायालयाने दूर राहायला हवे, असे मत मुस्लिम लॉ बोर्डाने व्यक्त केले.

तिहेरी तलाक, बहुपत्नित्व आणि निकाह हलाल या तीन गोष्टींसंदर्भात खंडपीठात आतापर्यंत एकूण सात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील पाच याचिका या मुस्लिम महिलांकडूनच दाखल करण्यात आल्या आहेत. अयोध्या मंदिराच्या बाजूने असणाऱ्या गटाकडून रामजन्माच्या मुद्द्याला श्रद्धेचा रंग दिला गेला. त्यामुळे हा मुद्दा कायद्याच्या पलिकडचा आहे, असेही बोलले जाते. त्यामुळे तिहेरी तलाक याकडेही धर्मातील श्रद्धेचा प्रश्न म्हणून पाहण्यात यावे, असे बोर्डाने म्हटले आहे.

याबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल म्हणाले, १९३७ मध्ये झालेल्या कायद्यानुसार काही प्रथा परंपरा इस्लाम विरोधात मानल्या जातात. तरीही धर्माचे पालन करणारे लोक त्या मनोभावे पाळतात. त्यामुळे तिहेरी तलाकच्या प्रश्नाकडे धर्माशी निगडीत बाब म्हणून पाहण्यात यावे, असेही मुस्लिम बोर्डाने म्हटले आहे. हा कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मागील अनेक दिवसांपासून तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर विविध क्षेत्रातून वाद-प्रतिवाद होत असताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.