पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून लष्करी कारवाई करावी, असा सल्ला मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचा दावा ‘चूर्ण वाल्या’ बाबांनी केला आहे. जर हे खरे असेल तर देव भारताचे भले करो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अप्रत्यक्षपणे रामदेव बाबांवर टीका केली आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरील संदेशात रामदेव बाबा भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे.
मोदींनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळवावा – रामदेव बाबा
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल ऑपरेशन करत दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत तब्बल ३८ अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. याशिवाय, अशाप्रकारच्या धडक कारवाईचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भूभाग परत मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन योगगुरू रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या पार्श्‍वभूमीवर रामदेवबाबा यांचे नाव न घेता ‘चूर्णवाले बाबा’ म्हणत दिग्विजयसिंह यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.