फक्त आरक्षणामुळे देशाचे भले होणार नाही. देशाच्या सामाजिक रचनेत आणि मागासवर्गातील कुटुंबांच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी आरक्षण पुरेसे नाही, असे मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले आहे.

रांची येथे ‘लोकमंथन २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोपाला सुमित्रा महाजन या उपस्थित होत्या. महाजन म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: असे म्हटले होते की देशात आरक्षण फक्त १० वर्षांसाठी दिले पाहिजे. दहा वर्षांत देशात समान विकास होईल असा त्यांचा अंदाज होता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. संसदेने दरवेळी आरक्षणाची कालमर्यादा वाढवली, असे महाजन यांनी म्हटले आहे. देशातील सामाजिक सलोख्यासाठी आपण डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

देशात महिलांचा आदर केला जात नाही. त्यामुळे देश पुढे जात नाही. महिला मागे राहिल्या तरी देशाचीही प्रगती होणार नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी विरोधकांवर टीका केली. देशातील काही इतिहासकार परदेशात भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करत आहेत. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देश आणि समाजाचे विभाजन करणाऱ्या वृत्ती सक्रीय आहेत. गोरगरीब आदिवासी जनतेला धर्मांतर करण्यास भाग पाडले. पण देशातील भाजपा सरकारने याविरोधात कायदा तयार केला, असे त्यांनी सांगितले.