केरळ, पंजाब, हरयाणा या राज्यात करोना साथीची शिखरावस्था गाठली गेली असून कठोर निर्बंधांचे पालन केले तर देशातील करोना बळींची संख्या आठ हजारपेक्षा कमी  राहू शकेल, असे मत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारताचा यात एकच घटक  म्हणून विचार करणे चुकीचे आहे कारण काही राज्ये ही इतर देशांचा विचार करता एखाद्या देशासारखीच आहेत, एवढी त्यांची लोकसंख्या मोठी आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात, महानगरात परिस्थिती वेगळी आहे, असे सांगून हैदराबादच्या इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे संचालक जी.व्ही. मूर्ती यांनी म्हटले आहे,की करोना साथीचा विचार देश पातळीवर न करता राज्य किंवा जिल्हा पातळीवर करावा. त्या पातळीवरील शिखरावस्थांचा विचार करण्याची गरज आहे. १० लाख लोकसंख्येत भारतात रुग्णांचे प्रमाण २५ एप्रिलला १७.६ होते ते २५ मे रोजी ९९.८ झाले आहे. महाराष्ट्रात ते एप्रिलमध्ये १० लाखात ६१.९ होते, ते २५ मे रोजी ३८३ झाले आहे. तामिळनाडूत हे प्रमाण २५ एप्रिलला २३.४ तर २५ मे रोजी १९९.३ होते. गुजरातेत एप्रिलमध्ये ४८.१ व २५ मे रोजी २१९, तर दिल्लीत २५ एप्रिलला १४० तर २५ मे रोजी ६९० होते. महाराष्ट्र , तामिळनाडू, गुजरात ही राज्ये शिखरावस्थेच्या जवळ आहेत. केरळ, पंजाब, हरयाणा यांनी शिखरावस्था पार केली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात देशातील सत्तर टक्के रुग्ण आहेत. या सगळ्या राज्यांनी शिखरावस्था गाठल्याशिवाय देशाने शिखरावस्था गाठली असे म्हणता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीकडे पाहता ही शिखरावस्था जूनची सुरुवात किंवा जुलैचा मध्य या काळात गाठली जाऊ शकेल.

मूर्ती यांनी सांगितले,की काही प्रारूपानुसार टाळेबंदीमुळे ८० हजार ते १ लाख मृत्यू टाळले गेले आहेत. देशात रोज १० लाखात २ जणांचे मृत्यू होत आहेत, अशी गेल्या आठवडय़ातील स्थिती होती. जर सर्व निर्बंध व नियम पाळले गेले तर  भारतात मृतांची संख्या ७५०० ते ८००० पर्यंत सीमित ठेवता येईल. याचा अर्थ दर दहा लाखात पाच मृत्यू असे हे प्रमाण असेल.

कोविड १९ रुग्णात भारताचा दहावा क्रमांक असल्याबाबत त्यांनी सांगितले, की ही आकडेवारी दिशाभूल करणारी आहे, कारण  भारताची लोकसंख्या युरोपातील अनेक देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. दहा लाखात किती रुग्ण व किती मृत्यू हा निकष येथे महत्त्वाचा आहे. भारतात दहा लाखात मृत्यचे प्रमाण खूप कमी  म्हणजे  ३ आहे तर दहा लाखात रुग्णांचे प्रमाण १०१ आहे. स्पेनमध्ये दहा लाखातील रुग्ण ६०५०, अमेरिकेत ५०९८, ब्रिटनमध्ये ३८२५, इटली ३८०१ असे आहे. भारतात दर दहा लाखात बळींची संख्या तीन आहे. स्पेन ६१५, ब्रिटन व इटलीत ५४२, फ्रान्स ४३५, अमेरिका ३०० या प्रमाणे दहा लाखातील बळी आहेत. दक्षिण आशिया व आग्नेय आशियात दहा लाखातील मृत्यूचे व रुग्णांचे प्रमाण खूप कमी आहे.

टाळेबंदी १ जूनला उठवावी का?

१ जूनपासून टाळेबंदी उठवावी का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले,की टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवावी व नंतर विशिष्ट  भागांवर लक्ष केंद्रित करून तेवढय़ा भागापुरते निर्बंध ठेवावेत. त्यात प्रतिबंधात्मक क्षेत्रे, राखीव क्षेत्रे असे वर्गीकरण आहे. पुढील अनेक महिने लोकांनी एकत्र जमू नये. चित्रपटगृहे, धार्मिक ठिकाणे बंद ठेवावीत. जर ती सुरू करायची असतील तर फार आधुनिक पद्धतीने त्याचे निर्जंतुकीकरण करावे लागेल, निर्जंतुकीकरण मार्गिका तयार कराव्या लागतील. कमी अंतराच्या बससेवा सुरु कराव्यात, मोठय़ा अंतराच्या बससेवा सुरू करणे घातक आहे. मेट्रो सेवा निर्जंतुकीकरण करून सुरु करता येईल.

दहा लाखातील रुग्ण- भारताची स्थिती

२५ एप्रिल   २५ मे

भारत   १७.६   ९९.८

महाराष्ट्र ६१.९   ३८३

तमिळनाडू   २३.४   १९९.३

गुजरात ४८.१   २१९

दिल्ली  १४० ६९०