केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हरियाणातील पंचकुला येथून पुन्हा एकदा पाकिस्तानाला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही दिवस अगोदरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. याचा अर्थ पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हे मान्य केले आहे की, भारताने बालाकोटमध्ये काय केले आहे. आता पाकिस्तानशी जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीर (पीओके) वर होईल. शिवाय जर गरज पडलीच तर बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो असा इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला आहे.

कलम ३७० बाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी हे हटवण्यात आले. शेजारी आंतरराष्ट्रीय संघटनेचा दरवाजा ठोठावत आहे व सांगत आहे की भारताने चूक केली आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नाही. येत्या काळात चर्चा झालीच तर ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर होईल इतर कोणत्याही मुद्द्यावर होणार नाही.