भ्रष्टाचारप्रकरणी अडकलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावरुन बिहारमध्ये सत्ताधारी महागठबंधनमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. संयुक्त जनता दलाचे आमदार शाम बहादूर सिंह यांनी आता या प्रकरणाला आणखी हवा दिली आहे. “भ्रष्टाचारप्रकरणी अडकलेले तेजस्वी यादव यांनी त्वरीत राजीनामा द्यायला हवा. जर ते राजीनामा देत नसतील तर त्यांना बडतर्फ करून महागठबंधन तोडायला हवे” असे त्यांनी म्हटले आहे.

सिंह म्हणाले, तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यामुळे जर सरकार पडणार असेल तर पुन्हा निवडणुकांना सामोरे जायला हवे. नाहीतर पुन्हा भाजपसोबत सरकार बनवायला पाहिजे. याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाच्या बाबतीत विचारल्यानंतर आपण तर आत्ताच महागठबंधन तोडायला तयार आहोत असेही ते म्हणाले. राजद सोबत काम करण्यास सर्वच लोकांना अडचणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपसोबत आम्ही सत्तेत होतो तेव्हा सर्व ठीक होते. इतक्या दबावाखाली सरकार काम करत नव्हते. त्यांनी पुढे म्हटले की, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशेजारी आजकल लहान मुलं बसल्याचे बरे वाटत नाही.

सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आरोपी बनवले आहे. याप्रकरणी जदयूने तेजस्वी यांना पदाचा राजीनामा देण्याप्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. मात्र, राजदने तेजस्वी यांच्या राजीनाम्याची मागणी थेट धुडकावून लावली आहे.

बिहारमध्ये सत्ताधारी महागठबंधनमध्ये संयुक्त जनता दल, राष्ट्रिय जनता दल आणि कॉंग्रेस यांचा समावेश आहे.
[jwplayer Rsyrg51Y]